देणग्या घेणाऱ्या शिक्षण संस्थांविरुद्ध “मिसा’चा बडगा; शिक्षणमंत्र्यांचा इशारा
हैदराबाद, दि. 3 – हायस्कूलमध्ये प्रवेश देताना ज्या शैक्षणिक संस्था देणग्या गोळा करतात त्यांचे विरूद्ध मिसा कायद्याचा वापर करण्याचा इशारा आंध्रचे शिक्षणमंत्री एम. व्ही. कृष्णराव यांनी त्या त्या संस्थांना दिला आहे. कृष्णराव हे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, काही खासगी शिक्षण संस्था या ना त्या सबबीवर देणग्या गोळा करीत असतात. अशा तऱ्हेने बेकायदा देणग्या गोळा करणाऱ्या शिक्षण प्रमुखांना मिसाखाली अटक केली जाईल, हे ध्यानी ठेवावे.
पुण्यात पालख्यांचे उत्साहाने स्वागत
पुणे – आज सायंकाळी 5 चे सुमारास संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे येथे आगमन झाले. पुणेकरांनी पालख्यांचे उत्साहाने स्वागत केले. सकाळी 5 वाजता निगडी येथून तुकाराम महाराजांची पालखी पुण्याकडे निघाली. 12 चे सुमारास ती दापोडी येथे आली. गावकऱ्यांनी वारकऱ्यांना भोजन दिले.
आवश्यक वस्तूंचे भाव 20 ते 40 टक्क्यांनी खाली आले
मुंबई – मुंबई शहरातील आवश्यक वस्तूंचे भाव 20 ते 40 टक्क्यांनी खाली आले आहेत. ही घसरण गेल्या 5 वर्षांत अनुभवास आली नव्हती. सरकारने आणीबाणी पुकारल्यानंतर भाव खाली आणण्यासाठी अनेक उपाय योजले.