लोकशाही म्हणजे मुके एकमत नव्हे
मुंबई, दि. 16 – लोकशाही म्हणजे केवळ एकसंधपणा वा “मुके एकमत’ नव्हे. मतभिन्नतेला लोकशाहीत जागा आहे, परंतु जबाबदार मतभिन्नता हवी, विरोध रचनात्मक हवा, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी म्हटले. चुकीच्या गोष्टींवर जे उपाय सुचवू इच्छितात, अशा कोणालाही आपल्या समाजात, तसे करण्यास अमर्याद वाव आहे, अनेक परंपरागत लोकभ्रमांविरुद्ध, समाजातील वाईट रूढींविरुद्ध, औद्योगीकरणामुळे होणाऱ्या वाईट परिणामांविरुद्ध आपण लढू शकतो व लढणे आवश्यकच आहे; परंतु अविचाराने नको, असेही गांधी म्हणाल्या.
धर्माच्या नावाखाली प्रगतीस विरोध नको
मुंबई – धर्माच्या नावाखाली प्रगतीच्या धोरणांना नेत्यांनी विरोध करू नये, असे उद्गार मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण काढले. सक्तीच्या कुटुंब नियोजनाचा कायदा करण्यापूर्वी सर्व समाजाच्या लोकांना विश्वासात घेतले जाईल.
दंगलीत वापरण्यासाठी बंदुकीच्या रबरी गोळ्या
मुंबई – संतप्त जमावाला काबुत आणण्यासाठी बंदुकीच्या रबरी गोळ्यांचा वापर मुंबईत करण्यासाठी केंद्रीय गृहखात्याचा पाठिंबा आहे. सीमा सुरक्षा पोलीस व दिल्लीच्या संशोधन संस्थेने या गोळ्यांच्या चाचण्या घेतल्या. एका गोळीचे वजन 50 ग्रॅम आहे.