विविधा : कान्होजी आंग्रे

-माधव विद्वांस

18 व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल यांचे आज पुण्यस्मरण. सरखेल या शब्दाचा अर्थ आरमारप्रमुख असा होतो. कान्होजींचा जन्म ऑगस्ट 1669 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी संकपाळ कुटुंबात झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे वीर राणा संक या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात त्यांच्या आईवडिलांना मूल होत नसल्याने देवाला नवस केला की, देवा तुझ्या अंगाऱ्याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आडनाव अंगारे ठेवू. त्यांना त्याप्रमाणे पुत्र होताच त्यांचे नामसंस्कार केले व ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्यांचे बालपण हर्णेजवळच्या सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना सागराची सवय झाली. सागराच्या लाटांवरच ते मोठे झाले. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. हा किल्लाच पुढे त्यांनी काबीज केला.

सन 1698 मध्ये कोल्हापूरचे छत्रपतींनी त्यांना “दर्यासारंग’ अशी पदवी देऊन कोकण किनाऱ्याची जबाबदारी सोपवली. कोकण किनाऱ्यावर कारवारपर्यंत त्यांचे जणू अधिराज्यच होते. त्यांनी इंग्रज व पोर्तुगीजांवर दहशत बसविली. मात्र सिद्दी जोहरच्या ताब्यातील जंजिरा त्यांना घेता आला नाही. कान्होजींनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजांना लक्ष्य केले.

ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला. कान्होजींनी मराठ्यांचे आरमार शास्त्रशुद्ध पद्धतीने कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोकण किनारपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे मंडळींवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजींची जहाजे केरळपासून उत्तरेस सुरत-कच्छपर्यंत दिमाखाने निर्वेधपणे समुद्रातून संचार करीत होती.

त्यांनी डच, पोर्तुगीज खलाशी नोकरीवर घेतले. कुलाब्यास जहाजे बांधण्याचा कारखाना काढला. विजयदुर्ग या सागरी किल्ल्यावर 1698 मध्ये कान्होजींनी आपला पहिला नाविक तळ उभारला. तसेच खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून मुंबई बंदराची नाकेबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला.

विशेष म्हणजे सध्याचे पर्यटकांचे आवडते अलिबाग 17 व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी स्थापन केले व अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली. कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी महाराणी ताराबाई यांनाही मदत केली होती.

सातारा येथे शाहू महाराज आल्यावर कान्होजी त्यांचे बाजूला गेले. इंग्रजांना मुंबईमध्ये वखार टाकून फक्‍त व्यापारच करता येत होता व त्यासाठी कान्होजींना कर द्यावा लागत होता. कान्होजींचा मृत्यू 4 जुलै 1729 रोजी झाला आणि सागरावरचे कान्होजी नावाचे वादळही शांत झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.