शोधबोध : गॅलिलिओचे प्रयोग (भाग-2)

-दीपा देशमुख

गॅलिलिओला त्याचा वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रमही आवडेनासा झाला होता. त्याच वेळी घरातली आर्थिक परिस्थिती फारच ढासळत चालली होती. त्यामुळे पदवी मिळण्याआधीच गॅलिलिओला विद्यापीठ सोडावं लागलं. तिथून तो तडक फ्लॉरेन्सला आला. डेल मोन्टे नावाच्या गणितज्ज्ञानं पिसाच्या विद्यापीठात गॅलिलिओला गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवून दिली.

त्या काळी इटलीमध्ये वैद्यकीय शाखेला आणि खगोलशास्त्राच्या शाखेला खूप मान होता. पण गणित या विषयाकडे फारसं कोणी लक्ष देत नसे. त्यामुळे पिसामधल्या नोकरीत गॅलिलिओला पगारही फारसा नव्हता. पण आपला आवडता विषय शिकवायला मिळणं आणि वडिलांचा आर्थिक भार कमी करणं हे त्याचे दोन्ही हेतू साध्य होत होते. पिसाच्या विद्यापीठातलं गॅलिलिओचं पहिलं व्याख्यान प्रचंड गाजलं!

याच वेळी ऍरिस्टॉटलला देव मानून त्याचा शब्द प्रमाण मानणाऱ्या लोकांचा गॅलिलिओला राग यायला लागला. “जड वस्तू ही हलक्‍या वस्तूपेक्षा जमिनीवर आधी पडते’ असं ऍरिस्टॉटलनं दीड हजार वर्षांपूर्वी मांडलेलं म्हणणं त्याला पटत नव्हतं. ऍरिस्टॉटलच्या शब्दांची शहानिशा न करता झापडबंद समाज आणि विद्वान यांनीही ते मान्य केलं होतं.

अखेर त्यानं एके दिवशी याची खात्री करण्यासाठी पिसाच्या मनोऱ्यावरून जड आणि हलकी वस्तू खाली टाकून बघायचं ठरवलं. 1174 साली बांधलेला हा पिसाचा मनोरा आज तर लंबरेषेपासून 17 फूट झुकलेला आहे. या मनोऱ्यापाशी गॅलिलिओनं हा प्रयोग बघायला बऱ्याच लोकांना बोलावलं होतं. गर्दीतून वाट काढत गॅलिलिओ स्वतः मनोऱ्याच्या दगडी भिंतीच्या आतल्या, उभा चढ असलेल्या गोलाकार जिन्याच्या शेकडो पायऱ्या चढून वर गेला तेव्हा तो दमून घामानं डबडबलेला होता. 179 फूट उंचीवर त्यानं एक 50 किलोचा, तर दुसरा 1 किलोचा असे दोन तोफेतले गोळे ठेवले होते.

गॅलिलिओनं काही क्षणातच एकाच वेळी ते गोळे खाली सोडले. जमलेले सर्व लोक श्‍वास रोखून ते नाट्य बघत होते. अनेकांना ऍरिस्टॉटल चूक ठरतो की काय अशी भीतीही वाटायला लागली. गॅलिलिओच्या विद्यार्थ्यांचा मात्र आपल्या गुरूवर विश्‍वास होता. गॅलिलिओ हा इतरांसारखा केवळ पुस्तकी पंडित नाही हे त्यांना ठाऊक होतं. काही क्षणातच दोन्ही तोफेचे गोळे जमिनीवर येऊन पडले. पण ते अचूकरीत्या एकाच क्षणी खाली पडले नाहीत.

जेव्हा जड गोळा जमिनीवर आदळला, तेव्हा हलका गोळा जमिनीपासून 2 इंचावर होता इतकंच. हा फरक हवेच्या खालून मिळणाऱ्या रेट्यामुळे आहे असं गॅलिलिओनं सांगितलं. गॅलिलिओचं म्हणणं बरोबर आहे हे बहुतांशी लोकांना मनोमन पटलं होतं. अशा तऱ्हेनं एकूणच गॅलिलिओनं 1591 च्या सुमारास प्रयोगाच्या साहाय्यानं जड आणि हलकी वस्तू एकाच वेळी खाली पडतात, हे दाखवून दिलं आणि ऍरिस्टॉटलच्या मतांना तडा दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.