शाहरुख खानला काही दिवसांपूर्वीच युनिव्हर्सिटी ऑफ बेडफोर्डशायर आणि युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गकडून मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता त्याला लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ लॉ कडून मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शाहरुख खान वेगवेगळ्या चॅरिटॅबल संस्थांसाठी काम करत असतो. त्याच्या या कामाच्या योगदानाबद्दल त्याला या मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे.
गुरुवारी या युनिव्हर्सिटीच्या 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभामध्ये शाहरुखला या मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले. शाहरुख खानने गेल्या कित्येक वर्षांपासून एक उत्तम अभिनेता अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. याशिवाय त्याने फिल्म ऍक्टर, प्रोड्युसर, टेलिव्हिजन होस्ट, परोपकारी आणि उद्योगी म्हणून स्वतःला स्थिरस्थावर आणि यशस्वी करून दाखवले आहे. भारतातील मानवाधिकार संघटनांसाठी काम करून त्याने पीडीतांची मदतही केली आहे. त्याने सरकारच्या कित्येक योजनांमध्येही हातभार लावला आहे. त्यामध्ये पल्स पोलिओ आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रणाशी संबंधित कार्यक्रमांचाही समावेश आहे. “मेक अ वीश’ यासारख्या अनेक संघटनांसाठीही शाहरुख खानने काम केले आहे.