जपानच्या संरक्षणासाठी अमेरिका अण्वस्त्रे वापरील
टोकियो, दि. 30 – जपानवर अणुशस्त्रांनी हल्ला झाल्यास अमेरिका जपानच्या मदतीला धावून जाईल. अमेरिकेने तसे वचन जपानला दिले आहे, असे एक जपानी सरकारी प्रवक्ता म्हणाला. अमेरिकन परराष्ट्र खात्याचे डायरेक्टर जनरल ताशिया यामाझाकी यांनी अमेरिकेला जपानविषयक धोरणाचे विशदीकरण प्रथमच केले.
राज्य वेतनमंडळासाठी अटी
मुंबई – कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणी ठरविणे, महागाईभत्ता, कमाल व किमान वेतनातील तफावत कमी करणे व वेतनश्रेणी निश्चित करणे वगैरे बाबी वेतन मंडळाने विचारात घ्यायच्या आहेत.
भुईकोट किल्ल्यातील ज्वारीचे रहस्य
मिरज – मिरजेच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचा बुरुज पाडत असता एका कपारीत काळ्या रंगाची ज्वारी दिसू लागली. ती ज्वारी जळलेली आहे. काळ्या मण्याप्रमाणे ती दिसते. चुरडली गेली तर तिचे पीठ होते. एका तरुणाने ही ज्वारी पाहिली. त्याने थोडी अधिक माहिती घेतली तर त्या काळ्या ज्वारीचे वर जी बुरुजाची माती आहे ती पांढरी आहे. तेथून पांढरे पीठ पडते. तो थर फार नाही. पण त्या कपारीत आजूबाजूस व तळास भरपूर काळी ज्वारी दिसत आहे. ही ज्वारी इतक्या खोलवर कशी? इतिहास कालातील ज्वारीचे ते कोठार असावे, असे वाटते.