विविधा : मा. दीनानाथ मंगेशकर

-माधव विद्वांस

संगीत रंगभूमीच्या सुवर्ण युगाचे एक प्रतिभावंत शिल्पकार व लता-आशा-हृदयनाथ-उषा-मीना या पंचरत्नाचे पिता दीनानाथ मंगेशकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म गोव्यातील मंगेशी येथे 29 डिसेंबर 1900 रोजी झाला. तेथील निसर्गरम्य परिसरात दीनानाथांचे बालपण गेले.पं. दीनानाथ मंगेशकर यांचे मूळ नाव दीनानाथ हर्डीकर. ते दीना म्हणून ओळखले जायचे. 

वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच दीनानाथ यांनी बाबा माशेलकर यांच्याकडून गायन व संगीताचे प्राथमिक धडे घेतले. त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे शिक्षण घ्यायचे होते, तथापि ते रामकृष्णबुवा वझे यांच्या सानिध्यात आले व त्यांच्या शैलीने ते आकर्षित झाले. त्यांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले.त्यानंतर ते बिकानेरला गेले आणि किराणा घराण्याचे पंडित मणिप्रसाद यांचे वडील पंडित सुखदेव प्रसाद यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले.

वयाच्या 11 व्या वर्षी ते किर्लोस्कर संगीत मंडळी आणि किर्लोस्कर नाटक मंडळीत सामील झाले. कालांतराने त्यांनी किर्लोस्कर मंडळी सोडली आणि वर्ष 1918 मध्ये चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांच्यासह बलवंत नाटक मंडळीची स्थापना केली. या नवीन मंडळाला राम गणेश गडकरींचा आशीर्वाद लाभला.

या नाटक मंडळीने जुन्या गाजलेल्या नाटकांबरोबर सामाजिक प्रबोधन करणारी तसेच देशभक्‍ती, समाजसुधारणा यांचे दर्शन घडवणारी राम गणेश गडकरी, वीर वामनराव जोशी, वि. दा. सावरकर, वासुदेव शास्त्री खरे, विश्राम बेडेकर इ. अग्रगण्य नाटककारांची नवनवीन नाटके रंगभूमीवर आणली.
दीनानाथ यांच्या व्यक्‍तिमत्त्वामुळे आणि मधुर आवाजाने त्यांना मराठी रंगभूमीमध्ये लोकप्रियता मिळाली. त्यावेळच्या “गंधर्व’ आणि “ललितकलादर्श’ अशा प्रस्थापित नाटक मंडळींबरोबर बलवंत मंडळींनी स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले.

दीनानाथांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वर्ष 1916 मध्ये गडकरींच्या पुण्यप्रभाव नाटकात “किंकिणी’ व पुढे “कालिंदी’ या स्त्री भूमिका केल्या. मास्टर दीनानाथांच्या गायनाने प्रेक्षकांची पकड घेतली तसेच भावबंधनमधील “लतिका’ उग्रामधील “पद्मावती’ तसेच रणदुंदुभीमधील “तेजस्विनी’ या भूमिका यशस्वीपणे वठविल्या.”मानापमान’मधील धैर्यधरप्रमाणे स्त्री व पुरुष पात्रेही त्यांनी वठविली होती. दीनानाथांच्या गाण्यांतून व अभिनयातून प्रामुख्याने वीर, शृंगार, शांत हे रस प्रत्ययास येत असत. कुणाचेही अनुकरण न करता, स्वतःचे स्वतंत्र आणि अत्यंत भावमधुर व काळजाला भिडणारे गाणे गाऊन मराठी नाट्यसंगीतावर बालगंधर्वप्रमाणेच दीनानाथांच्या गानपद्धतीचा ठसादेखील स्पष्टपणे उमटलेला आढळतो.

नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्‍त संगीतही दीनानाथ उत्तम प्रकारे, स्वतःच्या स्वतंत्र व कल्पक वळणाने गात असत. त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला, असे मानले जाते. श्रीमद्‌ शंकराचार्यांनी दीनानाथांना “संगीत रत्न’ म्हणून गौरवले. वर्ष 1934 मध्ये “बलवंत पिक्‍चर कॉर्पोरेशन’ काढून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. “कृष्णार्जुन युद्ध’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी अर्जुनाची भूमिका केली. त्यांची “सुहास्य तुझे मनासि मोही’ यासारखी या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली.
पं. दीनानाथांचे 24 एप्रिल 1942 रोजी पुण्यात निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.