- 11 महिन्यांत 38 गुन्हे ; इतर सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या सात घटना
- सामूहिक हल्ल्यात पोलीस जखमी, पोलिसांची वाहनांचीही तोडफोड
मागाेवा-२०२०
पिंपरी – शहरात वाढलेल्या गुन्हेगारीत सामान्य नागरिकच नव्हे तर पोलीस आणि सरकारी कर्मचारीही सुरक्षित नाहीत. गेल्या अकरा महिन्यांच्या कालावधीत पोलिसांवरील हल्ल्याच्या 38 घटना घडल्या आहेत. तरा इतर सात सरकारी कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले झाले आहेत. गेल्यावर्षी (2019) याच कालावधीत पोलिसांवरील हल्ल्याच्या 33 घटना घडल्या होत्या.
लॉकडाऊनच्या काळात करोनापासून बचाव करण्यासाठी नागरिक आपल्या घरात बसून होते. त्यावेळी पोलीस मात्र रस्त्यावर होते. शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये करोनाचा झपाट्याने प्रसार होत होता. हा प्रसार इतर भागात होऊ नये म्हणूान संचारबंदीच्या काळात करोनाग्रस्त भागात पोलीस तळ ठोकून होते. चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर भागात पोलिसांवर सामुदायिक हल्ल्याचे दोन प्रकार घडले. यात काही पोलीस जखमीही झाले. पोलिसांच्या सरकारी आणि खासगी वाहनांचीही जमावाने तोडफोड केली. याबाबत पोलिसांवर हल्ल्याचे गुन्हे दाखल झाले. मात्र तरीही पोलीस रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत होते.
चिंचवड परिसरात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला एका महाभागाने बोनेटवर फरफटत एक किलोमीटरपर्यंत नेहले होते. करोना काळात कार्यरत असलेल्या पोलिसांशी रस्त्याने विनाकारण फिरण्यासाठी हुज्जत घालून धिंगाणा घातल्याचा देखील घटना घडल्या आहेत. किरकोळ शाब्दिक वाद करता करता पोलिसांना धक्काबुक्की करत बेदम मारहाण देखील झाली आहे.
वाहतूक व्यवस्थापनापासून, मंत्र्यांची सुरक्षा, शहर, गाव वस्त्यांवर गस्त, किरकोळ चोरट्यांपासून मोठमोठ्या गुन्ह्यांच्या तपासात पोलीस कार्यरत असतात. पण समाजाची सुरक्षा करणारे पोलीसच आज सुरक्षित राहिलेले नाहीत.
पोलिसांप्रमाणेच इतर सरकारी खात्यामध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी देखील अनेकदा नागरिकांच्या रोषाला बळी पडतात. वर्षभरात सात सरकारी नोकरांवर हल्ले झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. या सातही घटनांमधील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जानेवारी, ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी एक घटना तर मार्च आणि जुलै महिन्यात इतर सरकारी नोकरांवर हल्ल्याच्या प्रत्येकी दोन घटना घडल्या आहेत.
दोन गुन्ह्यांचा तपासच नाही
जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात 38 पोलिसांवर हल्ले करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्या सर्व गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात केली. वर्षभरात सरकारी नोकरांवरील हल्ल्याच्या एकूण 45 घटना घडल्या आहेत. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी 33 पोलिसांवर तर 16 अन्य सरकारी कर्मचा-यांवर असे एकूण 49 प्रकार घडले होते. आश्चर्याची बाब म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दोन गुन्ह्यांचा तपासच लागला नाही.
म्हणून ते अधिकारी झाले निलंबित
पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेला मारहाण केल्याची घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या महिलेला अटक केली. मात्र अटकेची वेळ चुकली. सुर्यास्तानंतर महिलेला अटक केली म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची नंतर खूप चर्चा झाली.