आज तुम्हाला डॉल्बी-डीजेचा आवाज आला का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर आजच्या दिवशी या क्षणापर्यंत तरी तुम्ही नशीबवान आहात. युवा नेत्यांपैकी कुणाचातरी वाढदिवस रोज असतोच हो; पण सध्या लग्नसराईही जोरात सुरू आहे. डॉल्बीचा त्रास झाला, कानठळ्या बसल्या, कानाला दडे बसले, हृदयाची धडधड वाढली तरी आपण काहीही बोलू शकत नाही, कारण मोठा आवाज हा “सामाजिक प्रश्न’ आहे की अन्य कोणत्या कॅटेगरीतला आहे, हे अजून ठरलेलं नाही.
मागे एकदा कुणीतरी व्याख्या ठरवली होती; पण ती टिकली नाही. असो, आपण महाराष्ट्रीय लोकांनी तरीसुद्धा स्वतःला भाग्यवान मानलं पाहिजे, कारण उत्तर भारताप्रमाणं आपल्याकडे लग्नाच्या वरातीत किमान बंदुकीतून गोळीबार तरी होत नाहीत. अजूनही आपल्याकडे तणाव निर्माण झाला तरच बंदूक बाहेर निघते. (अर्थात, कुणाच्या बंदुकीतून गोळी झाडली गेली हे सगळ्यांना समजतं; पण ती कुणी झाडली हे पोलिसांसकट कुणालाच समजत नाही, हा भाग वेगळा!) लग्नकार्यात गोळ्या-बिळ्या न झाडता म्युझिक लावून नाचायची रीत मराठी माणसानं इमानदारीत जपलीये. फक्त म्युझिक सिस्टिम बदलत गेल्यात. आधी ब्रास बॅंड होते. नंतर बॅंजो आला, नंतर डीजे आणि डॉल्बीचं आगमन झालं. यातल्या प्रत्येक म्युझिक सिस्टिमचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे आणि असणारच; पण आवाज चढत्या क्रमानं वाढवतच गेला, हे खरंय!
बंदुकीच्या गोळीचा आवाज डॉल्बी-डीजेपेक्षा मोठा असावा. तसं नसतं तर गोळ्या झाडून उपयोगच नव्हता. या संदर्भात पंजाबातल्या दोन ताज्या घटना वस्तुतः वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांच्यात संबंध जोडण्याचा मोह अनावर होतो. पहिली घटना तरनतारनमध्ये घडली. लग्नाच्या वरातीत तब्बल शंभरपेक्षा जास्त गोळ्या झाडल्या गेल्या. बंदुकीची गोळी महाग असते म्हणे! म्हणजेच श्रीमंतीबरोबर शक्तीचंही प्रदर्शन करण्याचा संबंधिताचा हेतू असावा. पण डॉल्बीपेक्षा मोठा असणारा बंदुकीचा आवाज पोलिसांना मात्र ऐकू आला नाही. (कदाचित संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची काही कामानिमित्त नुकतीच मुंबईवारी घडली असावी.) गोळीबाराची सेंच्युरी झाल्यानंतर या वरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरू लागला आणि मग तो पाहून पोलिसांनी तपासकार्याचा श्रीगणेशा केला.
पंजाबात बंदुकीचे जवळजवळ पावणेचार लाख परवाने आहेत म्हणे! आता राज्य सरकारने धडाधड परवाने रद्द करायला सुरुवात केलीये. रविवारी एकाच दिवशी 813 परवाने रद्द झाले. पण आयडिया आवडली ती मुक्तसर साहिबचे पोलीसप्रमुख हरमनदीपसिंग गिल यांचीच! मोजक्या, खास प्रसंगीच ऐकू येणारा पोलीस बॅंड लग्नात भाड्यानं द्यायचा निर्णय त्यांनी घेतलाय. वाजतगाजत निघालेल्या वरातीबरोबर पोलिसांनी बंदोबस्तासाठी फिरण्याऐवजी वाजंत्रीवाले म्हणून फिरणं निश्चितच उभयपक्षी फायद्याचं!
एका तासासाठी पोलीस बॅंडचं भाडं असेल सात हजार रुपये. प्रत्येक अतिरिक्त तासासाठी साडेतीन हजार रुपये. (सरकारी कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये) बुकिंगसाठी अवघे ऐंशी रुपये! डॉल्बीचे दर आम्हाला ठाऊक नाहीत; पण बॅंडचे दर त्याहून कमी असल्यास आनंदीआनंद! डॉल्बीमुळं गोळीबाराचा आवाज दबत असल्यास तेही टळेल. पोलीस बॅंडमधील वादकांना उत्तमोत्तम गाण्यांचा कायम सराव राहील. सक्तीनं ऐकणाऱ्यांनाही बॅंड त्रासदायक होणार नाही. योजना यशस्वी झाल्यास देशभरात राबवण्यास काहीच हरकत नाही!