राजगुरूनगर – खेड पंचायतसमिती मधील बांधकाम विभागातील शाखा अभियंता बी एस शिंदे यांचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली.. याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र या घटनेमुळे प्रशासनासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेची प्राथमिक माहिती अशी, आज दि १४ रोजी खेड पंचायत समितीमध्ये बांधकाम शाखा अभियंता या पदावर कार्यरत असलेले बी एस शिंदे हे पंचायत समिती मधील एका कर्मचाऱ्याची दुचाकी घेवून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ऑफिस मधून बाहेर गेले. ते पुन्हा न आल्याने सबंधित दुचाकी मालक कर्मचारी आणि शिंदे यांच्या कारचा चालकाने त्यांना फोन लावण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा फोन बंद असल्याने कोणाचा संपर्क होत नव्हता. दरम्यान अनेक ठेकेदार आणि कर्मचारी त्यांचा शोध घेत होते ते राजगुरूनगर वाडा रस्त्याने गेले असल्याचे काहींनी पाहिले होते मात्र फोन बंद होता.
सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बुट्टेवाडी रस्त्यावर काही जण जात असताना रस्त्यापासून १५ मिटर आत वनविभागाच्या हद्दीतील झाडामध्ये शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी नेलेले दुचाकी एका ठिकाणी तर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी होता. त्यांच्या शरीरावर कोणतीही घात पाताची खून नव्हती. औषध घेतल्याचा कोणताही पुरावा नव्हता. छातीवर हात ठेवून झोपल्यासारखा त्यांचा मृतदेह होता. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली मात्र संशयास्पद कोणतीच वस्तू आढळून आली नाही.त्यामुळे अभियंता बी एस शिंदे याचा मृत्यू नक्की कसा झाला याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही.
खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात वाकळवाडी गावातील एका कामात भ्रष्टाचार झाल्याचा नुकताच मोठा गाजावाजा झाला होता. काम न करताच कामाचे बिल काढल्याचे उघड झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेला आले होते. त्यातच बांधकाम अभियंता शिदे यांचा संशयास्पद मृतदेह सापडल्यामुळे खेड पंचायत प्रशासन हादरले आहे.तर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेचा तपास खेड पोलियांकडून केला जात असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देवून झाडाझडती केली. मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर पुढील सत्य उघड होणार आहे.
खेड पंचायत समितीमध्ये काही वर्षांपूर्वी शिक्षण विभागात भ्रष्टाचार झाला होता त्यावेळी एका लीपिकाने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता ड्युटीवर असताना बी एस शिंदे यांची हत्या की आत्महत्या यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.