सोमवारी रात्री चिमणी अचानक उडून गेली. सकाळी उठून पाहिलं तर अनेकांना चिमणीच्या जागी कुत्रा दिसला. लोक घाबरले. म्हणाले, रातोरात चिमणी गेली कुठे? आणि हा गुरगुरणारा कुत्रा आला कुठून? शोध सुरू झाला. अहो, आपल्या सवयीचं, हक्काचं व्यासपीठ… निळंशार आकाशासारखं!
अर्थात आकाशाच्या विशालतेशी या व्यासपीठाचा आणि त्याचा वापर करणाऱ्यांचा दुरान्वयेही संबंध नाही, हा भाग वेगळा; पण आकाशाच्या निळाईच्या पार्श्वभूमीवर वर चोच करून ओरडणारी पांढरी चिमणी (किमान आकारानं तरी) आपल्या विचारांशी नातं सांगणारी! तिच्या गोड चिवचिवाटाची नक्कल मात्र आपल्याला कधीच करता आली नाही, कारण आपण पडलो “वापरकर्ते’… अर्थात यूजर. त्यातले काहीजण “प्रिव्हिलेज्ड’ म्हणजे ब्लू टिकवाले! एखादं माध्यम आपल्याला “वापरायला’ मिळालंय म्हणजे कुणालाही कसंही बोलण्याचा परवाना मिळालाय, अशी आपली ठाम समजूत.
पण सवय ती सवय! आपण स्वतः कितीही आक्रस्ताळेपणा करत असलो, तरी नाजूक चिमणी डोळ्यांना सवयीची झालेली. त्यामुळंच ट्विटरचे सगळे वापरकर्ते सोमवारी रात्रीपासून आपल्या लाडक्या शुभ्र चिमणीला शोधू लागले. चिमणी कुणाला घाबरून उडाली? या कुत्र्याला घाबरली? आपलं लाडकं व्यासपीठ कुणी हॅक-बिक केलं की काय? तशी भीती व्यक्त करणारे संदेशही फिरू लागले. पण थोड्याच वेळात ट्विटरचे नवे (आणि सतत प्रकाशझोतात राहणारे) मालक ऍलन मस्क यांनी चिमणी-कुत्रा प्रकरणावर सविस्तर खुलासा केला.
ट्विटरचा लोगोच आता बदललाय, हे वापरकर्त्यांना या खुलाशावरून समजलं. मस्क यांनी एक व्यंगचित्र पोस्ट केलं. त्यात हा गुरगुरणारा कुत्रा कारमध्ये बसलेला दाखवलाय. एक ट्रॅफिक पोलीस या कुत्र्याचं ड्रायव्हिंग लायसेन्स तपासतोय. लायसेन्सवर चिमणीचा फोटो आहे आणि “तो जुना फोटो आहे,’ असं कुत्रा पोलिसाला सांगतोय, असं चित्रात दिसतंय. मस्क यांनी केलेल्या पोस्टमध्ये वापरकर्त्यांना दिलेली वचनं पाळल्याचं म्हटलंय.
ही वचनंही अजबच! ब्लू टिक ही स्वतंत्र कॅटेगरी रद्द करण्याचं एकमेव वचन वापरकर्त्यांशी संबंधित; अन्यथा ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करणं, कॉस्ट कटिंग म्हणून निम्म्यास निम्मा कर्मचारीवर्ग कामावरून कमी करणं, त्यातल्या काहींना पुन्हा कामावर बोलावणं यातल्या एकाही वचनाचा वापरकर्त्यांशी थेट संबंध नाही. त्यामुळे ही वचनं वगैरे दुर्लक्षित करून लोकांनी बदललेल्या लोगोवरच लक्ष अधिक कॉन्सन्ट्रेट केलं. खरंतर बदललेला लोगोच लक्ष वेधून घेणार हे उघड होतं. मग नव्या लोगोवर काही मीम्स वगैरे शेअर झाली. वस्तुतः लोगोमध्ये दिसणारा कुत्रा हा “डॉग’ नसून “डॉज’ आहे, या वास्तवाचा उलगडा अनेकांना खूप उशिरा झाला. डॉजकॉइन ब्लॉकचेन या क्रिप्टोकरन्सीचं प्रतीक असणारा हा कुत्रा आता ट्विटरवर दिसतोय.
ट्विटरच्या चिन्हबदलामुळे भारतीय सर्वाधिक चिंतेत पडलेत. कारण उघड आहे. चिमणीसारखा नाजूक पक्षी लोगोमध्ये असतानाच या प्लॅटफॉर्मचा वापर अनेकांनी एकमेकांवर गुरगुरण्यासाठी आणि भुंकण्यासाठी केला. आता ऍप उघडल्याबरोबर समोर कुत्राच दिसणार. तोही आक्रमक चेहऱ्याचा. “ट्विट करणं’ म्हणजे चिडवणं, डिवचणं, हिणवणं असा शब्दकोशीय अर्थ आहे. चिमणीसारखी नाजूक छेडखानी करून एकमेकांना डिवचणं ट्विटरच्या ओरिजिनल निर्मात्यांना अपेक्षित असावं. पण तेव्हापासूनच जे एकमेकांना बोचकारत त्यांनी आता एकमेकांना चावू नये, एवढीच अपेक्षा!