सोक्षमोक्ष : स्मार्ट फोन, गेम यावरून चिंता ते चिंतन !

-जयेश राणे

“पब्जी’ या खेळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात या ऑनलाइन गेमवर बंदी घाला, अशी मागणी करत याचिका दाखल केली आहे. त्याविषयी खडे बोल सुनावताना न्यायालयाने सांगितले की, पालकच आपल्या मुलांना आयफोनसारखे महागडे फोन घेऊन देत असल्यामुळे “पब्जी’सारखे हिंसक गेम खेळण्यास मुले प्रेरित होतात. कोणतीच शाळा पब्जी किंवा इतर गेम मोबाइलवर खेळण्याची शाळेत परवानगी देत नाही. म्हणूनच आपली मुले घरी किंवा घराबाहेर मोबाइलवर काय खेळतात याकडे लक्ष देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालकांची असते.

पाल्यांनी कोणत्याही कारणासाठी केलेला हट्ट पुरवला नाही, तर अनेक पाल्य टोकाचे म्हणजे आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. हट्टाची कारणेही क्षुल्लक असतात. अधिक लाडावल्याने, मागितल्या त्या वस्तू तत्काळ आणून दिल्याने पालकांविषयी पाल्यांत धाक राहात नाही. त्यामुळे पाल्यांना वाटते की आपण पालकांना आपल्याला हवे ते फर्मान धाडू शकतो. ही स्थिती येण्यास कारणीभूत कोण ? याचाही अंतर्मुख होऊन विचार होईल का ?

स्मार्ट फोन हातात असणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरी-व्यवसाय करणाऱ्या वर्गाला “पब्जी’ या गेमचे नाव माहीत नाही असे होणारच नाही. गेल्या काही महिन्यांपासून या गेमने विद्यार्थी वर्गाला तर अक्षरक्ष: वेड लावले आहे. कोणताही गेम ही अशी गोष्ट आहे की, ती एकदा का खेळायला सुरुवात केली की त्यात तासन्‌तास कसे निघून जातात, याचे भान राहात नाही. मोबाइलची बॅटरी उतरायला आली की फोन हातातून खाली ठेवला जातो, काही महाभाग तर चार्जिंग चालू असतानाही स्वतःला गेम खेळण्यापासून रोखू शकत नाही. अशा प्रकारे गेमच्या अधीन झाल्याने ना त्या मोबाइलला आराम, ना डोळ्यांना, ना मेंदूला. जी काही झोप होत असेल तेवढाच काय तो आराम.

बाहेर फिरताना नीट निरीक्षण केले की लक्षात येईल की, काही मुले घोळक्‍याने बसलेली असतात. सर्वांच्या हातात स्मार्ट फोन असतो आणि त्यांची नजर मोबाइलमधील गेम सोडून जराही इतरत्र जात नाही. एवढी एकाग्रता गेम खेळताना येते कुठून? अभ्यास करताना नाक मुरडली जातात. एटीकेटी न लागता पुढच्या वर्गात कसे जाता येईल असा पास होण्यापुरता अभ्यास करणे, अशी मानसिकता बळावत चालली आहे. स्मार्ट फोनच्या वापराचा अतिरेक हेही या विचारामागे एक मुख्य कारण आहे.

चारजण एकत्र आले तरी त्यांचे मोकळेपणाने एकमेकांशी संभाषण नाही. अशी आजची भयावह अवस्था आहे. त्यामुळे मनातील विचार बोलून दाखवण्याचा भाग होत नाही. पालकांशी मुक्‍तपणे संवाद साधण्यात संकोच वाटणे समजू शकते. पण आजमितीस मात्र चारजण एकत्र आलेली माणसे केवळ आणि केवळ मोबाइल आणि गेम यांच्या अतिरेकी उपयोगामुळे एकमेकांपासून मैत्रीच्या नात्याने दुरावली आहेत. तो माझा मित्र, मैत्रीण आहे असे फक्‍त सांगण्यापुरतेच उरले आहे. सध्या अनेकांचा खास कोणी असेल तर ते आहे मोबाइल, सोशल मीडिया आणि गेम हेच.

आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि आपल्या पायावर लवकरात लवकर उभे राहावे अशी एक सर्वसामान्यपणे पालकांची अपेक्षा असते. पण ती धुळीस मिळवण्याचा विडाच उचलल्याप्रमाणे बहुतांश विद्यार्थी वागत आहेत. शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांचे मन भरकटत चालले आहे. पुढे महाविद्यालयात गेल्यावर तर आकाशालाच हात टेकल्याचा त्यांना भास होतो. मुलगा-मुलगी ऐकत नाही, अशी अनेक पालकांची तक्रार असते. काही पालक तर या विचारानेच चिंतित असतात, तर काही पालक आता हे प्रकरण आपल्या नियंत्रणात राहिलेले नाही. त्यामुळे जे काही व्हायचे ते होईल, असाही विचार करतात.

जे विदेशात चालू आहे तेच गेल्या काही वर्षांपासून भारतातही चालू झाले आहे. त्याचे बीज काही वर्षांपूर्वी रोवले गेले आणि आज त्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्‍यक असलेल्या वृक्ष संपदेवर कुऱ्हाड चालवली जात आहे. त्याचे दुष्परिणाम भोगत आहोत. यातील एक भेद असा की विषारी फळे देणाऱ्या वटवृक्षाला जोपासले जात आहे. त्याच्यापासून काहीही लाभ नसताना त्याला अनन्य साधारण महत्त्व दिले जात आहे. निसर्गाचा भाग असलेल्या वृक्ष संपदेकडे लक्ष देणे शासन-प्रशासन यांचे काम आहे. असा अविचार करून त्या वृक्षाकडे कोत्या नजरेने पाहिले जात आहे.

माझ्याकडे वेळ आहे तो माझ्यासाठीच आहे, असे दिसते. माझ्याकडे वेळ नाही, असे कितीतरीजण सांगतात. त्यांपैकी अनेकजण स्वतःचा वेळ गेम आणि सोशल मीडिया यांवर खर्च करतात. आपले शरीर कमकुवत, अशक्‍त, आजारांनी ग्रस्त असे बनवणे आवडेल की मजबूत, निरोगी बनवणे आवडेल?, याचा तरी विचार व्हावा. चांगल्या कृतीची चांगलीच फळे मिळतात.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुरेसा व्यायाम, योगा यांच्याकडे लक्ष दिल्यास त्याचा स्वतःच्या शरीरालाच लाभ होणार आहे. अशी लाभाची गोष्ट सोडून शरीराचा तोटा म्हणजे नुकसान करणाऱ्या गोष्टींच्या मागे लागून पदरी काहीच पडत नसते. कारण नुकसान हा शब्द नुकसानच दर्शवतो, तर लाभ (फायदा) हा शब्द लाभच दर्शवतो. प्रत्येक शब्दाचे विशेष असे अर्थ आहेत. आपण स्वतःचा नाश करून घेण्यासाठी एवढे उतावीळ का झालो आहोत ?

कोणतेही वाईट व्यसन हे सहजासहजी सुटत नसते. त्याला सोडण्यासाठी स्वतःलाच मेहनत घ्यावी लागते. व्यसन करण्यासाठी जशी मेहनत आहे, तसे ते सोडण्यासाठीही मेहनत आहेच! मनावर झालेला तो एक कुसंस्कार असतो. कुसंस्कारातून सुसंस्कारात येताना त्रास तर होणारच. कारण दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत. समविचारी लोकांचे पटकन सुत जुळते, असे म्हटले जाते. पण ते विचार कोणत्या धाटणीचे आहेत, हेही तितकेच लक्षात घेण्याजोगे असते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.