गोरखपूरमध्ये भाजपकडून भोजपुरी अभिनेत्याला उमेदवारी

नवी दिल्ली – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील आणखी आठ उमेदवारांची घोषणा केली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधून रवी किशनला उमेदवारी दिली आहे. दरम्यान, निरहुआनंतर भाजपने रवी किशनच्या रूपाने आणखी एका भोजपुरी अभिनेत्याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे.

गोरखपूरमध्ये पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्‍का देणारे आणि सपाला रामराम करून नुकताच भाजपमध्ये प्रवेश करणारे विद्यमान खासदार प्रवीण निषाद यांना संत कबीर नगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

पूर्वांचलमधील आठ जागांवरील उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. प्रतापगडमधून संगमलाल गुप्ता, आंबेडकर नगरमधून मुकुट बिहारी, संत कबीरनगरातून प्रवीण निषाद, गोरखपूरमधून रवी किशन, देवरियातून रमापती राम त्रिपाठी, जौनपूरमधून के. पी. सिंह आणि भदोहीतून रमेश बिंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने संत कबीर नगरातील विद्यमान खासदार शरद त्रिपाठी यांचा पत्ता कापतानाच त्यांचे वडील रमापती त्रिपाठी यांना देवरियातून उमेदवारी देत नाराजी थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. देवरियातील विद्यमान खासदार कलराज मिश्र यांनी आधीच निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक मनोरंजक ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.