दूरदर्शनवर प्रजासत्ताक दिनाचे संचलन
नवी दिल्ली, ता. 21 – प्रजासत्ताक दिनाची राजपथावरील संचलनाचे दूरवाणी दर्शनावर यंदा दर्शन घडवायचे असे आकाशवाणीने योजले आहे. दूरवाणी दर्शनाचे प्रायोगिक काम संशोधन विभागात सध्या चालू आहे.
घड्याळ उत्पादनवाढ शिफारशीसाठी समिती
नवी दिल्ली – भारतात घड्याळाच्या उत्पादनाची वाढ कशी करावी याबाबत शिफारशी करण्यासाठी भारत सरकारने तज्ज्ञांचे एक शिष्टमंडळ स्थापन केले आहे. निरनिराळ्या प्रकारची भिंतीवरची मोठी घड्याळे, टाइम-पीसेस आणि वॉचेस याबाबतची गरज आजमावून सध्या त्यांच्या उत्पादनाच्या किती सोयी उपलब्ध आहेत आणि पुढील वाढीसाठी काय केले पाहिजे याविषयी अहवाल या समितीने करावयाचा आहे.
जकात रिफंड बंद करू नका
पुणे – मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने एक निवेदन मुंबई सरकारला पाठविले असून जकातीचा रिफंड देण्याची पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची सध्याची ती पद्धती आहे ती बंद करण्यास मंजुरी देऊ नये अशी त्यात विनंती केली आहे.
केरोसीन तेल, तांदूळ आणि गहू कुटुंबप्रमुखांना कार्डावर देणार?
पुणे – केरोसीन तेलाची पुण्यातील कृत्रिम टंचाई घालविण्यासाठी तेल कंपन्या, त्यांचे मुख्य एजंट व किरकोळ विक्रेते यांच्याशी काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कलेक्टरांनी एकत्र विचारविनिमय केला व त्यावेळी नागरिकांना आवश्यक तेवढे केरोसीन कसे मिळत राहील यासंबंधी करावयाच्या काही गोष्टी सर्वानुमते ठरल्या. परंतु सर्वानुमते ठरलेली ही व्यवस्था शहरांत कार्यवाही होऊ शकलेली नाही, असे नागरिकांकडे चौकशी करता आढळून येते.
त्यामुळे कुटुंबप्रमुखाच्या नावांची केरोसीन कार्डे काढून, त्यांना त्या कार्डावर मान्य विक्रेत्यांकडून ठरलेल्या भावात केरोसीन मिळणार अशी शक्यता आहे.
वैज्ञानिकांनी देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासास साह्य करावे
नवी दिल्ली – देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला वैज्ञानिकांनी हातभार लावावा असे वैज्ञानिक कॉंग्रेसचे स्वागताध्यक्ष डॉ. व्ही. के. आर. व्ही. राव यांनी आपल्या भाषणांत सांगितले. आर्थिक कामगिरीला विज्ञान तंत्रज्ञानाची जोड देणे हे देशाच्या आर्थिक प्रगतीला तितकेच महत्त्वाचे आहे.