पिंपरी – सण साजरे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहे. त्याला नागरिकाही चांगला प्रतिसाद देत असून पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. नागरिक अशाच मूर्ती खरेदीकडे जास्त भर देताना दिसत आहेत. त्यामुळे यंदा तुरटी, पंचगव्य, लालमातीच्या पर्यावरण पूरक “बाप्पां’ना जास्त पसंती दिसत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात राज्यभरातून बाप्पाची मूर्ती विक्रीसाठी येते. त्यात पेण येथून येणाऱ्या मूर्तींना प्राधान्य दिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शाडूमातीच्या मूर्ती खरेदीकडे भाविकांचा कल वाढला होता. करोनाच्या काळात उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. त्या काळात पर्यावरणाचे रक्षण आणि इतर मुद्दे पुढे येत गेले. त्यामुळे पर्याय म्हणून विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक साहित्याकडे वळाले. नागरिकांची पसंती आणि पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन पर्यावरणप्रेमींसाठी तुरटी, पंचगव्य, लालमातीच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. रावेत, मोशी प्राधिकरणात लाल माती, शेतमातीच्या मूर्ती विक्रीसाठी आलेल्या आहेत. ग्राहकांचीही त्याला जास्त पसंती मिळत आहे.
असा आहे उपयोग
गेल्या काही वर्षांपासून भाविक शाडूमातीच्या मूर्तींना पसंती देत होते. मात्र, तीही पूर्णपणे विरघळत नाही, असे अनेकांचे म्हणणे समोर आले. तर, तुरटी, पंचगव्य आणि लालमाती पाण्यात पूर्ण विरघळते. तसेच त्याचा पनुर्वापरही होतो. तुरटी पाण्याच्या टाकीत टाकल्यात पाण्याची शुद्धीकरण होते. पंचगव्य पाण्यात पूर्ण विरघळते. त्याचा वापर खत म्हणून करता येतो. तर लालमातीचा वापर कुंडीमध्ये करता येतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
गेली 4 वर्षे तुरटीचे गणपती उपलब्ध करून देण्याचे काम ग्रीन विंडो सोल्युशन्स करत आहे. त्याच बरोबर लाल माती आणि गोमय (गाईच्या शेणाचे) गणपती सुद्धा उपलब्ध असतात. या मूर्तींना यंदा शिलांग, मेघालय, गुजरात, सुरत, उत्तरप्रदेश येथून मागणी आहे. शिलॉंग, मेघालयाला 121 तुरटीच्या मूर्ती पाठविल्या आहेत.
– प्रशांत राऊळ, संस्थापक, ग्रीन विंडो सोल्युशन्स.