भाजपातील इच्छुकांमध्ये मात्र अस्वस्थता
पिंपरी – शहरात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी दोन मतदार संघांचा मावळमध्ये तर एका मतदारसंघाचा शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो. हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासूनच शिवसेनेकडेच आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने मावळ राखले परंतु शिरुर गमावले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेत दुरावा निर्माण झाला आणि आता सर्वच निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली. भाजपकडून अधिकृतरित्या घोषणा झाली नसली तरी मावळ लोकसभेसाठी माजी आमदार संजय भेगडे आणि शिरुरसाठी विद्यमान आमदार महेश लांडगे यांची नावे चर्चेत होती. या दोन्ही नेत्यांनी तयारीही सुरू केली होती. परंतु अचानकच शिवसेनेचा एक गट भाजपसोबत आला आणि सगळीच स्थिती बदलली. आता या दोन्ही मतदारसंघातील आजी-माजी खासदारांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बळ मिळत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनांच उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या दोन्ही मतदार संघातून शिवेसेनेचे उमेदवार सातत्याने निवडणूक लढवित आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर युतीत ठिणगी पडली आणि मित्र पक्ष एकमेकांचे विरोधक झाले. त्यानंतर या दोन्ही मतदार संघामध्ये पुढील लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली होती.
परंतु आता शिवसेनेतील एक गट पुन्हा भाजपसोबत आला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघांवरुन स्थानिक पातळीवर रस्सीखेच होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून सतत जिंकणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना 2019 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे विजय मिळविला होता. आता आपला मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच जाणार हे निश्चित झाल्याने आढळराव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून तयारी करत असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांना मात्र यामुळे झटका बसला आहे. काही महिन्यापूर्वीपर्यंत आखली जाणारी सर्व समीकरणे पुन्हा एकदा बदलली.