पुणे, दि. 22 -बोचऱ्या थंडीने शहर आणि परिसराला हुडहुडी भरलेली असतानाच; हवामान विभागाच्या आकडेवारीने गोंधळ उडाला आहे. शहराच्या पूर्व पश्चिम उपनगरांमध्ये मंगळवारी तापमान 10 ते 11 अंश सेल्सिअस असताना, पूर्व भागातील उपनगरांमध्ये तापमान चक्क 18 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. त्यामुळे शहराच्या दोन भागांमध्ये तापमानात एवढा फरक कसा, याचे उत्तर हवामान विभागाकडेही नाही.
याबाबत हवामान विभागाकडे विचारणा केली असता; तापमान मोजण्याची यंत्रणा कुठे बसविली आहे. तसेच त्याची देखभाल दुरुस्ती नियमित झाली आहे का? ती यंत्रणा जमिनीपासून किती अंतरावर लावली आहे यावर तापमान मोजले जाते. त्यामुळे आम्ही केवळ आकडेवारी देऊ शकतो, तापमानाच्या फरकाबाबत सांगता येणार नाही असे धक्कादायक उत्तर एका अधिकाऱ्याने खासगीत बोलताना दिले आहे. तर, शहरातील उपनगरांमध्ये असलेल्या झाडांच्या घनतेमुळेही तापमानाचा फरक दिसू शकतो. मात्र, तो एवढा मोठा असणार नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
काय आहे आकडेवारीचा गोंधळ
हवामान विभागाकडून मंगळवारी सकाळी शहरातील तापमानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यात, शहराच्या पश्चिम भागातील उपनगरांमध्ये शिवाजीनगर 11.2 अंश सेल्सिअस, पाषाण 10.2 अंश सेल्सिअस, एनडीए 10.7 अंश सेल्सिअस, हवेली 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. तर त्याच पूर्व भागाकडील उपनगरांमध्ये वडगावशेरी 18.2 अंश सेल्सिअस, मगरपट्टा 17 अंश सेल्सिअस , कोरेगाव पार्क 15.5 अंश सेल्सिअस तर हडपसरचे तापमान 14 अंश सेल्सिअस नोंदविले आहे. त्यामुळे, शहरात वेगवेगळया भागात थंडीची तापमान वेगवेगळे कसे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शहराची भौगोलिक रचना आणि झाडांच्या घनतेवर शहराच्या तापमानात वेगवेगळ्या भागात चढ-उतार दिसतात. मात्र, हा फरक 2 ते 3 अंशाच्या आसपास असतो. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात फरक कसा पडला हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, एखाद्या भागात मोठ्या प्रमाणात सिमेंटची बांधकामे असतील आणि झाडांची संख्या कमी असेल तर तापमानात फरक असतो पण तो खूप कमी असतो.
– मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका