दत्तात्रय भेगडे यांना उपाध्यक्षपदावर संधी
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी ऍड. राहुल तांबे पाटील, उपाध्यक्षपदी दत्तात्रय भेगडे यांची निवड झाली. दोन्ही पदाधिकारी भीमाशंकर सहकार पॅनेलचे आहेत.
राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणूक मतदान 6 नोव्हेंबर व मतमोजणी 7 नोव्हेंबर रोजी झाली होती. ही निवडणुकीत अत्यंत चुरशीने झाली होती. यामध्ये भीमाशंकर सहकार पॅनेलला 17 पैकी 12 जागांवर घवघवीत यश मिळाले. यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची ही पहिलीच निवडणूक होती.
आज मंगळवारी (दि 22) बॅंकेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. सह निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. मुलाणी यांनी काम पाहिले.
या निवडणुकीसाठी मावळते अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, उपाध्यक्ष अरुण थिगळे, संचालक किरण आहेर, किरण मांजरे, विजयाताई शिंदे, विजय डोळस, राजेंद्र सांडभोर, दिनेश ओसवाल, समीर आहेर, सागर पाटोळे, अविनाश कहाणे, गणेश थिगळे, विनायक घुमटकर, अश्विनी पाचारणे, रामदास धनवटे, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे व बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यासाठी बॅंकेचे माजी अध्यक्ष अशोक भुजबळ, राजेंद्र गोरे, बिपिन रासकर, संतोष वाव्हळ, संदेश गीते, काळूराम पिंजन, गणेश बोत्रे, सुधीर वाघ, ऍड. गणेश सांडभोर, ऍड. वैभव कर्वे, ऍड. योगेश मोहिते, ऍड. पी. डी. केदारी, गौतम कोतवाल, पप्पूशेठ टोपे, दिनेश कड, आशा तांबे, उपसरपंच गणेश लांडगे आदी उपस्थित होते. मावळते उपाध्यक्ष अरुण थिगळे यांनी आभार मानले.
बॅंकेच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात 17 शाखांमधून बॅंकेचे कामकाज सुरू आहे. तो आलेख कायम ठेवताना वसुलीसाठी निवडणुकीचा वाया गेलेला कालावधी व जवळ आलेला मार्च एन्ड विचारात घेऊन व सभासद हित जोपासना करून कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केले जातील.
-ऍड. राहुल तांबे, नवनिर्वाचित अध्यक्ष
बॅंकेच्या कामकाजात सर्वसमावेशक सहभाग आणि योग्य व धोरणात्मक निर्णय घ्यायला प्राधान्य दिले जाईल.
-दत्तात्रय भेगडे, नवनिर्वाचित उपाध्यक्ष