नोंदणी व मुद्रांक विभागाची प्रणाली; दररोज 40 हजार नागरिकांकडून पडताळणी
– गणेश आंग्रे
पुणे – जमीन, सदनिका अथवा दुकाने आदींचे जुने दस्ताऐवज शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने “ई-सर्च’ ही संगणक प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये नोंदणी व मुद्राक विभागाने दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी झाल्यावरच लगेच ते ई-सर्च प्रणालीमध्ये अपलोड केले जात आहे.
रियल टाईमध्ये ई-सर्चवर दस्ताऐवज उपलब्ध होत असल्याने नागरिकांना संबधित मालमत्तेचा मालक कोण आहे, संबधित मालमत्तेचा व्यवहार कधी झाला याची माहिती तात्काळ घरबसल्या मिळत आहे. देशात पहिल्यांदाच रियल टाईममध्ये दस्ताऐवज ऑनलाइन उपलब्ध करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. करोना संकटाच्या काळात ऑनलाइन सुविधेचे महत्त्व अधिक पटू लागले असून दररोज सरासरी 35 ते 40 हजार नागरिक या प्रणालीला भेट देत असून मालमत्तेची मालकी हक्काची पडताळणी करत आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्यात अग्रेसर आहे. याचाच एक भाग म्हणून खरेदी-विक्री व्यवहाराचे जुने दस्त ऑनलाइन पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक्र विभागाच्या www.igr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. याच्याच पुढच्या टप्प्यात नोंदणी झालेले दस्त लगेचच ई-सर्चमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. यामध्ये खरेदीदाराची आर्थिक फसवणूक होते. तसेच एक सदनिका अनेक बॅंकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतल्याचे प्रकारही घडतात. दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेले दस्त लगेच ई सर्च मिळत असल्याने मालमत्तेचा मालक कोण, खरेदी – विक्री व्यवहार कधी झाला याची माहिती नागरिकांना मिळत आहे. ई-सर्चवर जमिनीच्या सर्व्हेनंबर अथवा गटनंबरनुसार त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डच्या नंबरनुसारही मालमत्तेची माहिती मिळत आहे.
‘ई-सर्च’ मध्ये 2002 ते आजपर्यंतचे दस्त उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या दस्त पाहता येतात. ई सर्च या सुविधेचा वापर करून शोधलेल्या दस्ताची अथवा दस्तांच्या सूचीची (इंडेक्स) प्रत डाऊनलोडही येते. लॉकडाऊनमुळे दुय्यम निबंधक कार्यालये बंद होती. त्यामुळे या सुविधेचे महत्त्व दिसून आले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी दररोज सरासरी सुमारे 20 ते 25 हजार नागरिक भेट देत असत आता यामध्ये वाढ झाली असल्याची माहिती नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
ई सर्च सुविधेचे फायदे
* दस्त क्रमांकानुसार अथवा मिळकतक्रमांकानुसार शोधण्याची सुविधा
* ऑनलाईन सर्च
* दस्त शोधण्यासाठी इतर कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही
* प्रत डाऊनलोड करण्याची सुविधा