पिंपरी, दि. 30 – अनेक महिन्यांपासून धुळखात पडलेल्या वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक 30 मधील “कन्वेनियन्स शॉपिंग सेंटर’ मधील व्यावसायिक स्वरुपातील 20 दुकानांची लिलाव प्रक्रिया राबवून 80 वर्षांच्या कालावधीसाठी विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक लिलावधारकांनी 26 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल महिवाल यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील उद्योग-व्यवसायाला चालणा देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने चिंचवड येथील वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक 30 येथे दुमजली “कन्वेनियन्स शॉपिंग सेंटर’ तयार केले. त्यामध्ये 31 व्यावसायिक गाळ्यांची निर्मिती केली. त्यातील 11 दुकानांसाठी 5 जानेवारी 2023 रोजी ई-लिलाव प्रक्रिया राबवून 80 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर विक्री करण्यात आली. आता उर्वरित 20 दुकानांच्या विक्रीसाठी प्राधिकरणने ई-लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही लिलाव प्रक्रिया 11 मे 2023 रोजी राबविण्यात येणार आहे. व्यवसायिक गाळे घेणाऱ्या इच्छुक व्यवसायिकांनी शासनाच्या https://eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. नोंदणी प्रक्रिया 27 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 26 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी पाच पर्यंत सुरू राहणार आहे. तरी, इच्छुक व्यक्तींनी लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.