मुंबई – राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. सध्या चित्रपटाचे कलाकार या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यामध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अज्ञातांनी निषेध नोंदवत जोरदार राडा केल्याचे समोर आले. निषेध व्यक्त करणाऱ्यांनी यावेळी संपूर्ण क्रू मेंबर्सना काळे झेंडे देखील दाखवले.
‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की हा चित्रपट महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करतो. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान या निषेध कर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी मध्ये येत प्रदर्शन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी प्रदर्शन करणाऱ्यांनी ‘गांधी अमर रहेच्या घोषणा देखील दिल्या.
या कार्यक्रमाला दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अभिनेता दीपक अँटनी आणि सहयोगी निर्माता ललित श्याम टेकचंदानी उपस्थित होते. कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना बोलवण्यात आले होते. यानंतर हा चितपट गोडसेंचा गौरव करत नसल्याचे निवेदन निर्मात्यांनी जारी केले.
View this post on Instagram
गुजराती चित्रपट दिग्दर्शक दीपक अँटनी या चित्रपटात महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. आणि नथुराम गोडसेची व्यक्तिरेखा मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी देखील या चित्रपटातून पदार्पण करताना दिसणार आहे.हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.विशेष म्हणजेच शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.