शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे कोरेगाव भीमा ते शिक्रापूर दरम्यान सुरू असलेल्या गॅस पाइपलाइनचे खोदकाम सुरू असताना अचानकपणे मानवी कवटी आणि मानवी शरीराची हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोमशंकर बापू राठोड (रा. भोसरी गावठाण, ता. हवेली, मूळ रा. गाणगापूर ता. अकतलूर जि. गुलबर्गा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, सणसवाडी गॅस पाइपलाइनचे खोदकाम सुरू असून येथे एका जेसीबीच्या सहाय्याने पाइपलाइन खोदण्याचे काम सुरु असताना जेसीबी चालकाला खड्ड्यात मानवी कवटी दिसून आली. त्यावेळी जेसीबी चालकाने तातडीने पाइपाइनच्या कामावर असलेल्या अभियंत्यास ही माहिती दिली.
त्यानंतर त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली असता शिक्रापूर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यात पाहणी करून पंचनामा केला असता त्यामध्ये मानवी शरीराचे काही भाग आढळून आले. घडलेल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण भालेकर करीत आहेत.