पुणे – शहरातील बंगाली समाज बांधवांतर्फे भोसले नगर परिसरात दुर्गा पूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल पाच दिवस चालणाऱ्या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बांगिया संस्कृती संसद या संघटनेतर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची सुरवात रविवारी (दि.10) रोजी झाली. यावेळी संघटनेच्या प्रमुख सुजाता पॉल आणि
सचिव सुभाषिस बागोल यांच्या प्रमुख उपस्थितीत दुर्गा पूजेची सुरुवात झाली. दहा ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणाऱ्या या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये 10 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन प्रश्नमंजुषा, 11 ऑक्टोबर रोजी लहान मुलांचे सादरीकरण, 12 ऑक्टोबर महासप्तमीचे औचित्य साधत बंगाली चार नाटकांचे सादरीकरण, 13 ऑक्टोबर रोजी पुण्यातील प्रख्यात नर्तकांद्वारे नारीशक्तीवर आधारित नृत्य सादरीकरण आणि 14 ऑक्टोबर रोजी बंगालची लोकगीते सादर केली जाणार आहे.
हे सर्व कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात सादर होतील. दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील मूर्ती निर्माते, पोस्टमन’ची भूमिका बजावणारे पुजारी आणि कामगारांना संघटनेतर्फे देणगी दिली जाणरा असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.