दरवाढीमुळे वाहन विक्रीवर परिणाम चालूच

नवी दिल्ली – महाग करण्यात आलेल्या वाहनांच्या किमतीचा फटका उद्योगाला बसला असून मारुती सुझुकीसारख्या अनेक कंपन्यांच्या वाहन विक्रीत वर्षांच्या पहिल्याच महिन्यात घसरण नोंदली गेली आहे. गेल्या, 2018-19 या आर्थिक वर्षांत भारतातील प्रवासी वाहनांची विक्री अवघ्या 2.70 टक्‍क्‍यांनी वाढली होती.

चालू, 2019-20 वित्त वर्षांच्या सुरुवातीपासूनच अनेक कंपन्यांनी विविध गटातील वाहनांच्या किमतीत 10 टक्‍क्‍यांपर्यंतची वाढ लागू केली. त्याचा विपरीत परिणाम अनेक कंपन्यांच्या वाहन विक्रीवर झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मारुती सुझुकीच्या एकूण विक्रीत एप्रिल 2019 मध्ये 17.20 टक्‍के घसरण होऊन 1.43 लाख झाली आहे. कंपनीने वर्षभरापूर्वी याच कालावधीत 1.72 लाख वाहने विकली होती. मारुतीची वाहनेही एप्रिलपासून काही प्रमाणात महाग झाली आहेत.

कंपनीची देशांतर्गत वाहन विक्रीदेखील रोडावत (-18.70 टक्‍के) 1.34 लाख झाली आहे. एप्रिल 2018 मध्ये ती 1.64 लाख होती. एप्रिलमध्ये मारुतीची निर्यात 14.60 टक्‍क्‍यांनी वाढून 9,177 झाली आहे. वर्षभरापूर्वी याचदरम्यान ती 8,008 होती. कृषी उपकरण निर्मितीतील आघाडीच्या एस्कॉर्टसने गेल्या महिन्यात 14.90 टक्‍के घसरण नोंदविताना 5,264 ट्रॅक्‍टरची विक्री केली आहे. एप्रिल 2018 मध्ये कंपनीच्या ट्रॅक्‍टरची विक्री 6,186 नोंदली गेली होती. गेल्या महिन्यात देशांतर्गत वाहन विक्री 18.2 टक्‍क्‍यांनी कमी होत 4,986 झाली आहे. कंपनीची निर्यात या दरम्यान 278 ट्रॅक्‍टरची राहिली आहे.

होंडा कार्स इंडियाने एप्रिलमध्ये दमदार कामगिरी बजाविताना 23 टक्‍के वाढीसह 11,272 वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने नव्या वित्त वर्षांच्या सुरुवातीलाच काही नवीन वाहने सादर केल्याने त्याचा यंदाच्या विक्रीवर परिणाम झाला नाही.दुचाकी वाहन गटात जपानच्या सुझुकी मोटरसायकल इंडियाने 12.57 टक्के वाढीसह एप्रिलमध्ये 65,942 वाहने विकली. तर कंपनीची देशांतर्गत वाहन विक्री 9.25 टक्‍क्‍यांनी वाढून 57,072 झाली आहे. चालू एकूण वित्त वर्षांकरिता कंपनीचे 10 लाख दुचाकी विक्रीचे लक्ष्य यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.