नाडी( फिजी) – आपल्या स्थापनेपासून आशियाई विकास बॅंकेने आशिया खंडातील देशांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बरीच मदत किती केली आहे. मात्र, ही मदत संबंधित देशाच्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून केले जाते. शिथिलीकरणानंतर अनेक देशात खाजगी क्षेत्रही पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यामुळे आशियायी विकास बॅंकेने खासगी क्षेत्राला अधिक वित्तपुरवठा करण्याच्या शक्यतेवर विचार करण्याची गरज आहे, असे भारताने म्हटले आहे.
बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक येथे सुरू आहे. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग करीत आहेत.
गर्ग यांनी सांगितले की, गेल्या साठ वर्षांत बॅंकेने भारत आणि इतर बऱ्याच देशांना पाणीपुरवठा, शिक्षण, दूरसंचार यंत्रणा विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केलेले आहे. आता भारतासारख्या देशातील खासगी यंत्रणा बळकट होत आहे. या यंत्रणेच्या माध्यमातूनही पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी बॅंकेने मदत करण्याच्या शक्यतेवर विचार करावा. सध्या खासगी क्षेत्राला बॅंक 3.14 अब्ज डॉलरचे अर्थसाहाय्य करीत आहे. गेल्या वर्षापेक्षा यात 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही समाधानाची बाब आहे. आगामी काळात यात वाढ करण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.
आशिया खंडातील अनेक देशांत पायाभूत सुविधा विकसित होण्यास आणि गरिबी कमी होण्यास आशियाई विकास बॅंकेने मोलाची मदत केली आहे आगामी काळात या बॅंकेचे काम आणखी वाढणार आहे.