पुणे – हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे राज्यात ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू असल्याचं पाहायला मिळतं. काही जिल्ह्यांमध्ये कडक ऊन आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
यामध्ये अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, मुंबई, रायगड या जिल्ह्यांचा विशेष समावेश आहे. दरम्यान, पुणे शहरातील महत्वाच्या भागांमध्ये देखील जोरदार स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली असल्याचं दिसत आहे.
शहरातील औंध, बाणेर रोड, विद्यापीठ परिसर, सांगवी तसेच मध्यवर्ती परिसरात पावसाने चांगलीच बॅटिंग केली. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली असून, शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पुढच्या 3-4 तासांत तुफान पाऊस होईल, असा इशारा देखील हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे.