पुणे – फुड डिलेव्हरी ऍपद्वारे पुण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एक) अटक केली, त्यांच्याकडून 51 लाख 60 हजार रुपये किंमतीचे एलएसडी स्टॅम्प (17 ग्रॅम वजनाचे 1 हजार 32 तुकडे) जप्त करण्यात आले आहेत.
सुशांत काशिनाथ गायकवाड (36,रा. सद्या बाणेर, मुळ.कोडोली सातारा), धिरज दिपक लालवाणी (24,रा. पिंपळे सौदागर), दिपक लक्ष्मण गेहलोत (25,रा. सनसिटी रोड), ओंकार रमेश पाटील (25,रा.वाकड), तर यापुर्वी रोहन दिपक गवई (24) याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
गवई याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत या चौघांची नावे समोर आली. हे आरोपी साखळी पद्धतीने अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने त्याना बाणेर, सिंहगड रोड, पिंपळे सौदागर व वाकड परिसरातून ताब्यात घेतले. गवई हा एमबीए करतो. तो शेवटच्या वर्षात आहे. तर गायकवाड हा देखील अभियंता आहे. इतर साथीदार सुद्धा उच्चशिक्षीत असून चांगल्या घरातील आहेत. मात्र व्यसन, शौक आणि पार्ट्याच्या नादातून त्यांनी हा अमली पदार्थ विक्रीचा धंदा सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस कर्मचारी विशाल शिंदे, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, सुजित वाडेकर, विशाल दळवी, संदीप शिर्के, राहुल जोशी, नितेश जाधव यांच्या पथकाने केली.
असे करायचे विक्री
धिरज लालवाणी, दिपक गेहलोत आणि ओंकार पाटील हे तिघे याचे मास्टरमाईंड आहेत. तर गवई आणि इतर हे पेडलर आहेत. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी ही नामी शक्कल लढवली होती. व्हॉटस्अपद्वारे संपर्क साधल्यानंतर डिलेव्हरी देण्यासाठी ते फुड ऍपद्वारे पार्सलच्या बहाण्याने ऑर्डर बुक करीत होते. व्यक्तीने ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करून पाठवले जात होते. त्यामध्ये काय आहे हे डिलेव्हरी बॉयला माहित नसायचे. मात्र, ही टोळी त्याचद्वारे अमली पदार्थाची विक्री करीत होती.