पणजी – ग्राहकांच्या शोधात चक्क पुनवर्सन केंद्रात दाखल झालेल्या तीन ड्रग्ज विक्रेत्यांना तेथून काढून टाकण्यात आले. त्यांनी ड्रग्जपासून मुक्ती मिळवण्याच्या बहाण्याने त्या पुनवर्सन केंद्रात नाव नोंदवले होते. म्हापसा येथील एका रुग्णालयात हा प्रकार उघडकीस आला. मात्र त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात आली नाही.
या रुग्णालयाच्या आवारात अंमली पदार्थ विकताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील दोघांना ही विक्री करत असताना रंगेहात पकडण्यात आले. हॉस्पिटलच्या शव ठेवण्याच्या खोलीजवळ त्यांनी हा साठा ठेवला होता.
जेंव्हा रुग्णालय प्रशासनाला त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती मिळाली, त्यावेळी त्यांनी त्यांची नावे पुनर्वसन केंद्राच्या यादीतून काढून टाकली. त्यांना पुन्हा प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला. या तीनही जणांनी पुन्हा उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले नाही, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र पाटील यांनी सांगितले. त्या दोघांना सुधारण्याची संधी देण्यात आली, असे ते म्हणाले.
पाटील यांनी सांगितले की, येथे येणाऱ्या प्रत्येकाकडून कोणताही गट निर्माण करणार नाही. तसेच अन्य उपचार घेणाऱ्यांशी संपर्क ठेवणार नाही, असे लिहून घेतले जाते. डॉक्टरांची वाट पाहताना अथवा मेथाडोनचा डोस घेताना त्यांचा इतरांशी संपर्क येणार नाही, याची काळजी घेण्यात येते.
या रुग्णालयात यापुर्वी उपचार घेणाऱ्या रॉनर्ट डिमेलो या विक्रेत्याने सांगितले की, हे विक्रेते अत्यंत कमी प्रमाणात ड्रग्जची विक्री करतात. काही वर्षापुर्वी एका शेजाऱ्यामुळे मला अंमली पदार्थांची सवय लागली. त्यानंतर मी त्याचा खर्च भागवण्यासाठी ड्रग्जची विक्री करू लागलो. मात्र, आता मला ड्रग्ज सोडायचे आहे.