वाहतूक विभागातील कामाच्या त्रुटीमुळे दंडाचा फटका
पुणे – शहरातील वाहतूक पोलीस सध्या बेशिस्त वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ई-चलनदेखील पाठवण्यात येते. मात्र, वाहनचालकांना चुकीचे चलन आल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर चुकीचे चलन आल्यास काय करायचे, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
वाहतूक पोलिसांच्या “कॉप फ्री जंक्शन’ या संकल्पनेंतर्गत शहरामध्ये शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त नागरिकांना याद्वारे ई-चलन पाठविण्यात येते. तर दंड न भरल्यास खटला विभागाची नोटीस देखील येते. मात्र, गाडी क्रमांक, दंडाचा “ऑप्शन’, मोबाइल क्रमांक चुकल्यास भलत्याच वाहनचालकाला भुर्दंड पडतो. चुकीचा दंड आकारल्यास नेमके काय करायचे, हे माहिती नसल्याने वाहनचालकांना दंड भरावा लागतो.
अशी आहे प्रक्रिया…
चुकीचे चलन प्राप्त झाल्यास वाहनचालकांना वाहतूक उपायुक्तांच्या नावाने पत्र लिहून, आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे. यामध्ये चुकीच्या चलनाचा तपशील, लायसन्स, आरसी बुक आणि चलनाचा तपशील पाठवलेल्या “मेसेज’ची प्रत या कागदपत्रांचा समावेश आहे. हे पत्र येरवडा परिसरातील वाहतूक शाखेच्या मुख्यालयात किंवा “सीसीटीव्ही ट्रॅफीक पुणे’ या पत्त्यावर ईमेल करता येणार आहे.