अनेक धार्मिक स्थळांवर भाविकांच्या कपडे परिधान करण्यावरून नियम जारी केले जात आहे. मात्र काहींनी या निर्णयावर टीका केली आहे. तर काही लोक या निर्णयाचे स्वागत करताना दिसत आहे. यातच आता ओडिशाच्या सुप्रसिद्ध प्राचीन जगन्नाथ पुरी मंदिरातही भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आले आहे. येत्या 1 जानेवारीपासून भाविकांना ड्रेसकोड संदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार आहे.
काही लोक मंदिरामध्ये देखील असभ्य प्रकारचे कपडे परिधान करून मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. हे चुकीचे असून काहींनी या प्रकरणाची तक्रार केली. त्या तक्रारीची दखल मंदिर प्रशासनानं घेतली असून हा नियम बनवण्यात आला आहे. यानुसार, मंदिरात प्रवेश करताना फाटक्या जीन्स, स्लीवलेस कुर्ते, हाफ पँट, शॉर्ट्स असे कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, कोणत्या प्रकारच्या कपड्यांना परवानगी असेल, यासंदर्भातली नियमावली काही दिवसांत जारी केले जाईल असेही सांगण्यात आले आहे.
याबाबत जगन्नाथ पुरी मंदिर प्रशासन प्रमुख रंजन कुमार दास म्हणाले की, “काही लोक इतरांच्या धार्मिक भावनांचा विचार न करता मंदिर परिसरात प्रवेश करत आहे. काही लोक मंदिरात फाटक्या जीन्स, स्लीवलेस कुर्ते, शॉर्ट्स घालून येताना दिसले, जणूकाही ते समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठीच आलेत. मंदिर हे भगवंताचं घर असून मनोरंजनाचं ठिकाण नाही. मंदिराचं पावित्र्य आणि महत्त्व अबाधित राखणं हे आमचं कर्तव्य आहे.” १ जानेवारी २०२४पासून हे नवे नियम लागू आहे.
कालकाजी मंदिरात ड्रेस कोड जारी –
दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात जाण्यासाठी भाविकांसाठी ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. कालकाजी मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी आता भाविकांना सभ्य कपडे घालून यावे लागणार आहे. कालकाजी मंदिर दिल्लीतील भाविकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि ते एक शक्तीपीठ देखील आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
कालकाजीशिवाय दिल्लीतील अनेक मंदिरांमध्येही ड्रेस कोड घालण्यात आला आहे. कालकाजी मंदिराच्या वेबसाइटनुसार, कालकाजी मंदिरातील भाविकांसाठी ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. ड्रेस कोड अंतर्गत, पुरुष भक्त पायघोळ, धोतर आणि पायजमा आणि वर शर्ट आणि टी-शर्ट घालून दर्शनासाठी येऊ शकतात. दुसरीकडे, महिला साडी आणि पायजमा सह चुरीदार परिधान करू शकतात.