सिंधुदुर्ग – मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी अनेक मंदिरामध्ये सध्या ड्रेसकोड लागू केले जात आहेत. मागील काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यासंदर्भात फलक लावण्यात आले होते. मात्र यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करण्यात आला आहे. श्रावण महिन्यात कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आले आहेत.
“श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांनी देवस्थानला सहकार्य करुन वस्त्रसंहितेचं पालन करावे. भाविकांनी फाटलेल्या जीन्स किंवा उत्तेजक कपडे परिधान करुन मंदिरात येऊ नये. आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे, हिंदू धर्माचं पालन करुन मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या भाविकांना या निर्णयाविषयी माहिती नसेल त्यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी पंचा, उपरणे, शाल असे साहित्य ठेवण्यात येणार आहे, जेणेकरुन कोणताही भाविक दर्शनाशिवाय मागे परतणार नाही. प्रत्येक भाविकाने या निर्णयाचं पालन करुन सहकार्य करावं,” असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.
अंगप्रदर्शक तसेच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना थेटपणे मंदिर प्रवेश करता येणार नाही. अशा भाविकांना देवस्थानकडून शाल, उपरणे, पंचा, ओढणी आदी वस्त्रे मोफत देण्यात येतील. यासाठी भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.