पुणे – “डीएसके ड्रीम सिटी’ प्रकल्प न्यायालयाच्या परवानगीने विकसित करण्याबाबत अबुधाबीतील बांधकाम व्यावसायिक कंपनीने दिलेला प्रस्ताव बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांनी स्वीकारला आहे. हा प्रकल्प नेमका कसा पूर्ण करता येईल, याबाबत त्यांनी तीन पर्याय सुचवले आहेत.
“ड्रीम सिटी’ पूर्ण करून त्याद्वारे ठेवीदारांना पैसे मिळावेत, याकरिता हा प्रकल्प विकसित करण्याची तयारी अबुधाबीतील “एएफसीओ इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट’ कंपनीने दर्शवली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी गेल्या महिन्यात सादर केला, यावर प्रतिसाद देत डीएसके यांनी नेमके कशा पद्धतीने बांधकाम पूर्ण करता येईल, याचा आराखडा हा प्रस्ताव सादर करणारे वकील ऍड. चंद्रकांत बिडकर यांना पाठवला आहे.
विकसकाने पहिल्या दोनपैकी एक पर्याय स्वीकारावा, अशी इच्छा डीएसके यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या दोन पर्यायांनुसार या प्रकल्पात 300 ते 400 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास किमान 4 ते 9 हजार कोटी रुपयांचा नफा होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी लागणारी रक्कम बुकिंगमध्ये मिळू शकते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
फुलं टाकू नयेत पण, दगडही मारू नयेत…
“लोकांनी किमान दगड मारू नये. या प्रकल्पात आता माझा आणि कुटुंबाचा वैयक्तिक फायदा नाही. प्रकल्प पूर्ण झाला तर त्यातून ठेवीदारांचे सर्व पैसे परत मिळतील. आयुष्यभर सन्मानाने जगलो. आता, सन्मानाने कर्जमुक्त होण्याची इच्छा आहे. मी गेल्यानंतर लोकांनी माझ्यावर फुले टाकू नयेत. पण, किमान दगड तरी मारू नयेत, एवढीच माफक अपेक्षा आहे,’ असे डीएसके यांनी ऍड. बिडकर यांना पाठवलेल्या प्रस्तावात नमूद आहे.
“डीएसके’ यांनी सुचवलेले पर्याय…
-मूळ आराखड्याप्रमाणे बांधकाम (डीपीआर)
-सर्व सामान्यांना परवडेल अशी घरे बांधावीत
– म्हाडाने प्रकल्प विकसित करावा