पुणे – बृहन्मुंबई महापालिका शाळांतील मोफत ऑनलाइन शिक्षणाचा लाभ राज्यातील इतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या ऑनलाइन वर्गाचे संपूर्ण राज्यभर प्रसारण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले असून ऑनलाइन शाळा सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चार माध्यमांचे राज्य मंडळ, आय.सी.एस.ई., सी.बी.एस.ई. या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू आहेत.
वर्ग उत्कृष्ट दर्जाच्या प्रशिक्षित विषय शिक्षकांमार्फत घेण्यात येत आहेत. यासाठी झूम, गुगल क्लासरुम, व्हॉट्स ऍप आदींचा वापर करण्यात येत आहे. इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. पहिली ते आठवीच्या सर्व इयत्तांसाठी प्रत्येक शालेय दिवशी सकाळी 8 वाजेपासून 45 मिनिटांच्या दोन तासिका तसेच इयत्ता नववी व दहावी करिता चार तासिकांचे लाइव्ह सेशन आयोजित करण्यात येते.
विद्यार्थ्यांचा ऑनलाइन प्रवेश मंजूर झाल्यावर त्यांना ऑनलाइन वर्गात उपस्थित राहण्याकरिता संबंधित लिंक व पासवर्ड देण्यात येणार आहे. ऑनलाइन वर्गाची सुविधा ही पूर्णपणे मोफत असून अध्ययन निष्पत्ती संबंधित प्रगतीपत्रक किंवा ऑनलाइन वर्गात उपस्थित राहिल्याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांचा देण्यात येईल. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील, क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनाही या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी काढले आहेत.