फुगेवाडी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजलाइनची समस्या आहे. पिंपरी शहरासह अनेक उपनगरांमध्ये ड्रेनेजलाइन तुंबून रस्त्यावर, घरादारांत दूषित पाणी शिरत आहे. फुगेवाडी येथील संजयनगरमध्ये सातत्याने ड्रेनेजलाइन तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. त्यामुळे येथील ड्रेनेजलाइनची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
फुगेवाडी येथील संजयनगर डेक्कन पेपर मिल जवळील भागात ड्रेनेजलाइन वारंवार तुंबत आहे. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाला वारंवार कळविले आहे. परंतु ड्रेनेजविभागाकडून केवळ तात्पुरती दुरुस्ती करून देण्यात येत असल्याने ही समस्या सातत्याने उद्भवत आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने येथे नवीन ड्रेनेजलाइन टाकून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. क्षेत्रीय अधिकार्यांनी येथील समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
ड्रेनेजलाइन तुंबून दूषित पाणी नागरिकांच्या घरादारांत शिरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच दूषित पाणी उघड्यावर वाहत असल्याने फुगेवाडी परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंगी, मलेरिया आदी आजारांचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील परिसरात धूरफवारणी करण्याची गरज आहे. तसेच ड्रेनेजलाइन दुरुस्त त्वरित करणे गरजेचे आहे.