पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. विरेंद्रसिंह तावडे याने वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी सादर केलेला परवानगी अर्ज विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी फेटाळला.
आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला हजर राहता येईल, अशी सूचना न्यायालयाने केली. या प्रकरणी 6 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) सीआरपीसीच्या कलम 294 नुसार, खटल्याशी संबंधित कागदपत्रांची यादी सादर केली.
त्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा, मृत्यूची कारणे, मृत्यूची वैद्यकीय सूचना, फॉरेन्सिक प्रयोगशाळांचे अहवाल, आरोपी संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयातून दोन लॅपटॉप जप्त केल्याचा आणि आरोपींच्या छायाचित्रांचा मेमो आदी तेरा कागदपत्रांचा समावेश आहे. सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले, तर आरोपींच्या वतीने ऍड. प्रकाश साळसिंगीकर यांनी बाजू मांडली.