डॉ. बोेरगे वैद्यकीय अधिकारी पदास अपात्र..!

महानगरपालिका आयुक्तांचा राज्य सरकारला अहवाल

विठ्ठल लांडगे

नगर – महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी अनिल अशोक बोरगे यांनी दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम अवघ्या एकाच वर्षात पूर्ण केल्याचे सेवापुस्तिकेसोबत जोडलेल्या शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रांवरुन स्पष्टपणे दिसते. हाच अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी डॉ. बोरगे यांनी मे 2004 ते मे 2006, अशी दोन वर्षांची रजाही घेतली. तथापि, अभ्यासक्रम पूर्ण झाल्याने प्रमाणपत्र डॉ. बोरगे यांनी मे 2005 रोजीच सादर केल्याचा धक्कादायक अहवाल महानगरपालिका आयुक्तांनी  राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना 3 मार्च 2021 रोजी सादर केला.

दरम्यान, याच अहवालावरुन महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर काम करत असलेले डॉ. अनिल बोरगे पदास अपात्र आहेत, असा दावा करत त्यांंना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी मुळ तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आज केली.

डॉ. बोरगे यांची महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावरील नियुक्ती, त्यासाठी डॉ. बोरगे यांनी जोडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला असल्याबाबतची शैक्षणिक प्रमाणपत्रे, याबाबत संदीप भांबरकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावरुन राज्य सरकराने 13 जानेवारी 2021 रोजी चौकशी करुन अहवाल पाठविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते.

डॉ. बोरगे यांच्या सेवापुस्तकातील नोंदीनुसार महापालिका आयुक्तांनी 3 मार्च 2021 रोजी प्रधान सचिवांना हा अहवाल पाठविला आहे. डॉ. बोरगे यांची जून 2003 रोजी महापालिकेच्या रक्तपेढीत वैद्यकीय अधिकारीपदावर नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांनी शैक्षणिक पात्रता एमबीबीएस, अशी होती. दरम्यान 2010 रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पद भरण्यााबाबत निर्णय झाला. त्यावेळी लगतचे असलेले आरोग्य अधिकारी किंवा उपआरोग्य अधिकारी पदाची ज्येष्ठता असायला हवी होती. मात्र, ती बोरगे यांच्याकडे नसल्याने ते पदाला पात्र होऊ शकले नाहीत.

दरम्यान, बोरगे यांचा प्रस्ताव तयार करुन मॉडेल नियम 2008 नुसार शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने डॉ. बोरगे यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी पद देण्यात आल्याची सेवा पुस्तिकेत नोंद आहे. मॉडेल नियम 2008 नुसार देखील या पदासाठी एम. डी., पी.एस. एम. आणि पाच वर्षांचा स्वच्छता विषयक कामे केल्याचा अनुभव बंधनकारक होता. मात्र, बोरगे यांच्याकडे तो अनुभव नव्हता, अशी स्पष्ट नोंद चौकशी अहवालात करण्यात आलेली आहे.

दरम्यान, बोरगे यांना 2016 रोजी वरील पदावर नियुक्ती देण्यासंदर्भात राज्य सरकारची मंजुरी मिळाली. तत्पूर्वी देखील बोरगे यांच्याविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, असे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, डॉ. बोरगे यांनी पदास आवश्यक असलेली पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र मे 2005 रोजी सादर केलेले आहे. वास्तविक हे प्रमाणपत्र मे 2006 नंतर मिळणे अपेक्षित होते. त्यामुळे दोन वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण झाल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे दिला असल्याचे आज उघड झाले.

महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे नाही. पात्रताधारक  अभ्यासक्रम पूर्ण केल्याची त्यांनी सादर केलेली प्रमाणपत्रे बनावट आहेत. दोन वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण कसा होईल?, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता नसलेल्या या अधिकार्‍याचे तत्काळ निलंबन व्हायला हवे.
संदीप भांबरकर,
मुळ तक्रारदार, नगर.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मला शैक्षणिक प्रमाणपत्र दिली आहेत. तक्रारदार हा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलपेक्षा मोठा नाही. त्यामुळे अशा तक्रारींचे स्पष्टीकरण देण्याची देखील गरज नाही. जो पदव्युत्तर अभ्यासक्रम मी पूर्ण केला आहे. तो एकच वर्षांचा आहे. त्यासंदर्भात अगोदरच मी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे ही तक्रारच खोटी आहे. तक्रारदाराने हीच तक्रार थेट न्यायालयात देखील केली होती. तथापि, तक्रार खोटी निघाल्यास जप्त होऊ शकेल, अशी अनामत तक्रारदार भरु शकले नाहीत. त्यामुळे माझ्या विरोधात करण्यात आलेली तक्रारच खोटी आहे.
डॉ. अनिल बोरगे
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.