नवी दिल्ली – हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी ग्रुपच्या शेअर्सची मोठी पडझड झाल्यानंतर बिकट आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या समुहाला पुढील वर्षी तब्बल दोन अब्ज डॉलसर्च कर्ज फेडायचे आहे. त्यांनी बॉंडद्वारे घेतलेल्या कर्जाची मुदत सन 2024मध्ये संपत आहे.
त्यांनी बरेचसे कर्ज विदेशातून घेतले असून गेल्या चार वर्षात त्यांच्यावरील कर्जाची रक्कम दुप्पट झाली आहे. या उद्योग समुहाने जुलै 2015 ते 2022 या अवधीत विदेशातील बॉंडद्वारे तब्बल 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. यातील एकाही बॉंडचे रिपेमेंट 2023 या वर्षात नाही, पण त्यांना पुढील वर्षी हे रिपेमेंट करावे लागणार आहे.
विदेशातील गुंतवणुकदारांना आश्वस्त करण्यासाठी अदानी समुहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर सिंग यांनी गेल्या महिन्यात सिंगापुर आणि हॉंगकॉंग येथे रोड शो केले. चालू महिन्यात ते दुबई, लंडन आणि अमेरिकेतही रोड शो करणार आहेत. कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम आहे असे गुंतवणुकदारांना स्पष्ट करण्यासाठी त्यांनी हे रोड शो केले आहेत. ज्या बॉंडची मुदत संपणार आहे त्याचे पैसे आम्ही निश्चीत परत करू. कारण कंपनीकडे येणारा आर्थिक फ्लो चांगला आहे, असे त्यांनी या रोड शोद्वारे स्पष्ट केले आहे.
अदानी समुहावर 2019मध्ये असलेले 1 लाख 11 हजार कोटींचे कर्ज 2023 मध्ये 2 लाख 21 हजार कोटी रुपये इतके झाले आहे. पैशाच्या चणचणीमुळे त्यांनी या आधीच आपले काही प्रकल्प रद्द केले आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्सची किंमत तब्बल 12 लाख 6 हजार कोटींनी घसरली आहे. मागच्या आठवड्यात काही प्रमाणात या शेअर्सचा भाव वधारला असला तरी ते झालेले नुकसान भरून काढण्यास असमर्थ ठरले आहे.