हाँगकाँग – चीनमधील रियल इस्टेट क्षेत्रातील बलाढ्य कंपनी एव्हरग्रँडेे दिवाळखोरीत निघल्यात जमा आहे. या कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करावी असा निर्णय हाँगकाँगच्या न्यायालयाने दिला. या कंपनीवर 300 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. हे कर्ज फक्त चीनमधील बँकांचे नसून जगातील इतर देशांच्या बँकांचेही आहे. यामुळे ज्या बँकांनी या कंपनीला कर्ज दिले आहे त्या बँका अडचणीत येऊन चीनच्या अर्थव्यवस्थेवर त्याचबरोबर इतर काही देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे.
या कंपनीवर 300 अब्ज डॉलरचे कर्ज आहेत तर मालमत्ता 240 अब्ज डॉलर आहे. चीनमधील इतर उद्योगातही या कंपनीचा वाटा आहे. त्यामुळे सर्वच उद्योगावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे. करोनाच्या काळात या कंपनीसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर ज्या ग्राहकांनी पैसे भरले आहेत त्यांना घरे देण्यास ही कंपनी असमर्थ ठरू लागली. त्यामुळे विविध न्यायालयामध्ये या कंपनीच्या विरुद्ध ग्राहकांनी दावे ठोकले.
चीनच्या राष्ट्रीय उत्पन्नात तेथील रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा तब्बल 30% आहे. त्यामुळे या घडामोडीचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर परिणाम होणार आहे. दरम्यान हाँगकाँग न्यायालयाचा निर्णय चीनमधील सरकार मानेल का यासंदर्भात शंका आहेत. असे असले तरी या कंपनीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्था परिणाम होण्याची शक्यता आता गृहीत धरण्यात येऊ लागले आहे.
भारताची स्थिती उत्तम –
भारतातही आय एल अँड एफ एस ही कंपनी दिवाळीत गेल्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रावर परिणाम झाला होता. मात्र भारतातील रिअल इस्टेट क्षेत्राचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान केवळ सात टक्के होते. भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र 477 अब्ज डॉलरचे समजले जाते. सरकारने हा पेच प्रसंग योग्यरीत्या हाताळला असतानाच घरांची मागणी तेव्हापासून एकतर्फी वाढत आहे. त्यामुळे भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये पेचप्रसंग उद्भवणार नाही असे विश्लेषकांनी स्पष्ट केले. 2023 मध्ये भारतातील घरांची मागणी 26 टक्क्यांनी वाढून 2.71 लाख घरांची विक्री झाली. घरांच्या आकारमानातही वाढ होत आहे.