पुणे – पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताचा बनाव करत मोटारीवर पेट्रोल टाकून दोघांचा खून करण्यात आला होता. मोटार आणि त्यातील दोघेही जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळले होते. सुरुवातीला पोलिसांना हा अपघात असल्याचे वाटले होते. मात्र, घातपाताच्या शक्यतेने तपास करता मोटारीवर पेट्रोल टाकून दोघांचा खून करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखल्यावर खवले मांजर तस्करीच्या व्यवहारातून 5 जणांनी मिळून दोघांचा गळा आवळून खून केला. नंतर अपघात असल्याचे दाखवण्यासाठी त्यांना गाडीसह जाळून गाडी घाटातून खाली सोडली होती. ही घटना 3 जुलैला घडली होती.
अशोक देवू हिलम (31, रा. माणगाव, रायगड) आणि गणेश रघुनाथ वाघमारे (27, रा. रोहा, रायगड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. गणेश सुनील पवार (रा. रोहा, रायगड), शंकर हिलम (रा. माणगाव, रायगड), लहान्या सोनू जाधव (रा. माणगाव, रायगड) अशी त्यांच्या साथीदारांची नावे आहेत. विजय आबा साळुंखे (32, रा. सावंतवाडी, सिंधुदूर्ग) आणि विकास विलास गोसावी (28, रा. निपाणी, बेळगाव) अशी खून झालेल्यांची नावे आहेत.