मुंबई – शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा विशेष असणार आहे. याच कारण देखील तसच आहे. एकनाथ शिंदेंच्या मोठ्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मोठ्या सभेद्वारे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. शिवाय यंदाच्या मेळाव्यासाठी शिवसेनेला मैदानासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागल्याने आता उद्धव ठाकरे या मेळाव्यात नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी मेळाव्यात सोनिया गांधींसह शरद पवारांचे विचार मांडू नका असा टोला नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावल्याचे समजते.
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे, यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असं होत नाही. तीन तासाची सभा त्यात कोणती लढाई असं स्पष्ट मत गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. तसेच आम्ही देखील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शिवतीर्थावर त्यांची सभा होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे सभा झालीच पाहिजे पण त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका असा टोला पाटील यांनी यावेळी नाव न घेता ठाकरेंना लगावला. तसेच आता नेमकं कोणाकडे जास्त लोक येतात याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे असंही पाटील यावेळी म्हणाले.