रशियाच्या मुत्सद्याची युक्रेनला धमकी
किव्ह -युक्रेनने तिसऱ्या महायुद्धाला चिथावणी देऊ नये, अशा शब्दात रशियाच्या मुत्सद्याने युक्रेनला धमकावले आहे. या युद्धादरम्यान आण्विक संघर्षाला कमी लेखू नका. असे या मुत्सद्याने म्हटले आहे. रशियाने आता युक्रेनच्या रेल्वे आणि तेलसाठ्यांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान रशियाच्या फौजांनी युक्रेनमधील लुकान्स्क प्रांतातील क्रेमिन्ना शहराचा ताबा मिळवला असल्याचे ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या शहरात रशियाच्या फौजा घुसल्या आहेत आणि लिझीयमच्या दक्षिणेकडे जोरदार धुमश्चक्री सुरू आहे, आता रशियाच्या फौजा उत्तर आणि पूर्वेकडून स्लोवियान्स्क आणि क्रामातोर्स्क या शहरांच्या दिशेने चाल करून जात आहेत. असे ब्रिटीश लष्कराने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कराजदानी किव्हपासून 575 किलोमीटरवरील क्रेमिन्ना शहराचा पाडाव झाल्याचे कसे समजले, हे मात्र ब्रिटीश लष्कराने स्पष्ट केले नाही. या वृत्तावर युक्रेन सरकारने त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
रशियाच्या फौजांकडून खारकिव्हवर जोरदार मारा केला जातो आहे. दोनेस्क आणि लुहान्स्क भागाचा पूर्ण ताबा घेम्याचा आटापिटा रशियाकडून सुरू आहे. खेरसोन भागातील रशियाच्या ताब्यातील वेलयाका ओलेकसांद्रिवा या गावात युक्रेनच्या सैन्याने एक दारुगोळ्याचे कोठार नष्ट केले आणि रशियाच्या 70 सैनिकांना ठार केले.रशियाने गेल्या 24 तासात केलेल्या तोफांच्या माऱ्यात पोपास्ना, लेसेचान्स्क आणि गिर्स्कके या शहरांचे मोठे नुकसान झाले आहे, असे युक्रेनच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
अमेरिकेकडून अधिक शस्त्रांची मदत मिळाल्यावर युक्रेन हे युद्ध अधिक काळापर्यंत सुरू ठेवू शकेल. त्यामुळे रशियाची दमछाक होईल आणि रशियाच्या सैन्याला मागे हटावे लागेल, असे जर युक्रेनला वाटत असेल, तर ते एक दिवास्वप्न आहे, या युद्धामध्ये नाटोला सहभागी होण्यास सांगून युक्रेन रशियाला चिथावणी देत आहे. नाटो सैन्य आता आगीत तेल ओतत आहे. यामुळे आण्विक संघर्षाचा धोका वाढू शकतो. युक्रेनने हा धोका तुच्छ लेखू नये.
सर्जी लावरोव्ह, रशियाचे संरक्षण मंत्री