तहसीलदार हनुमंत कोळेकर यांची सूचना
ओतूर- सध्या सर्वत्र करोना व्हायरसचीच चर्चा असताना जुन्नर तालुक्यात अशा प्रकारची परिस्थिती अजून तरी नाही. नागरिकांनी होम क्वारंटाइनचा चुकीचा अर्थ काढू नका, अशा सूचना तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी जनतेला दिल्या आहेत.
गावोगावी परगावाहून तसेच शहरी भागांतून आलेल्या नागरिकांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने त्यांची नोंद घेण्याचा निर्णय घेऊन आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना या नोंदी करून घेण्याची कामगिरी सोपविली आहे. जुन्नर तालुक्यात शहरी भागातून गावी आलेल्यांची 19 हजार नागरिकांची नोंद झाली असल्याची माहीती समोर आली. याबाबत तहसीलदार कोळेकर यांनी नागरिकांनी काळजी घेण्याबाबत सल्ला दिला. मात्र, यातून जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्व नागरिकांना तालुक्यातील जनतेला दिलेल्या सुचनांप्रमाणेच घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या गोष्टीचा उहापोह तथा चर्चा न करता घाबरुन जाऊ नका, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपण या परिस्थितीवर मात करू, असेही कोळेकर यांनी सांगितले.
- जुन्नरचे आमदार अतुल बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील अधिकारी, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांच्याशी बैठक घेऊन संपूर्ण माहीती घेऊन प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. तर प्रशासन व सुविधा आपल्यासोबत तत्पर आहेत. घाबरुन जाऊ नका, आपली काळजी घेऊन सूचनांचे पालन करा. आम्ही आपल्यासोबत आहोतच. सर्वांनी मिळून या आपत्तीचा सामना करून यावर मात करणार आहोत. माझा पाचही वर्षाचा पगार मी माझ्या तालुक्याच्या जनकल्याणाकरिता वापरणार, असा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे. मी आमदार होताना हे सांगितलेले आहे.