कोरेगाव – आ. महेश शिंदे हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना डावलून कामे करू नका अन्यथा कारवाई करू, असा इशारा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. त्याच वेळी कोरेगाव तालुक्यात करोनाचा फैलाव रोखण्यात यश मिळविल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे भरभरून कौतुकही केले.
मंत्री देसाई यांनी कोरेगाव तहशील कार्यालयात करोनाविरोधातील उपाययोजना व अन्य विषयांवर बुधवारी आढावा बैठक घेतली. आ. महेश शिंदे, पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक महेश बर्गे, राहूल प्र. बर्गे, राहुल र. बर्गे, सुनील बर्गे, प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार रोहिणी शिंदे, आरोग्य अधिकारी जाधव, मंडलाधिकारी धुमाळ, तलाठी शंकर काटकर उपस्थित होते.
बैठक सुरू झाल्यावर आ. शिंदे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. टंचाई आढावा बैठकीची माहिती दिली जात नाही. आराखडा तयार झाल्यावर आमदार म्हणून सही घेतली जात नाही, अशा तक्रारी त्यांनी करताच देसाई संतापले. महेश शिंदे हे लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. आराखड्यावर त्यांची सही घेतली पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नाराज करू नये अन्यथा मला संबंधितांवर कारवाई करावी लागेल, असे त्यांनी सुनावले. आ. शिंदे यांनी कोरेगावातील रस्त्यांसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सात कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत.
याबाबत त्यांना मुख्याधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. होम क्वारंटाइन न करता संशयित रुग्णांचे शाळांमध्ये विलगीकरण केले जात आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव अधिक झाला नाही. प्रशासनाचे काम कौतुकास पात्र आहे, असे देसाई म्हणाले.
तालुक्यात तलाठी, ग्रामसेवक दोन दोन महिने कामावर येत नसल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. त्यावर, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची सूचना देसाई यांनी दिली. कोरेगावमधील जमिनी एनए नसल्याने विकासात अडथळे येत असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले असता, नगरसेवकांना विश्वासात घेऊन एनए ऑर्डर करून घेण्याची सूचना देसाई यांनी दिली. तालुक्यात शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वाढला पाहिजे. कर्ज न देणाऱ्या बॅंकांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बॅंकांनी शेतकऱ्यांना त्वरित कर्जे दिली पाहिजेत, अशा सूचना देसाई यांनी दिली.