मुंबई- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. मृत्यूसमयी पंडित जसराज अमेरिकेत न्यू जर्सी इथं होते. तिथेच राहत्या घरी स्थानिक वेळेनुसार पहाटे सव्वापाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कन्या दुर्गा जसराज यांनी ही माहिती दिली.
करोनाच्या साथीमुळे अमेरिकेत लॉकडाऊन लागू करण्यात आला, तेंव्हा पंडित जसराज अमेरिकेतच होते. त्यामुळे त्यांनी तेथून भारतात न परतता तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना परत येण्याची संधीच मिळू शकली नाही. दरम्यान, आता पंडितजींचे पार्थिव अमेरिकेतून मुंबईत आणण्यात आले आहे.
पंडित जसराज यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांची मुलगी दुर्गा जसराज, पत्नी मधुरा जसराज आणि मुलगा शारंग देव यावेळी उपस्थित होते. सोमवारी 17 ऑगस्ट रोजी भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचे निधन झाले. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे.
मेवाती घराण्याचे गायक पंडित जसराज यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वेगळा आयाम दिला. पंडित जसराज यांनी तब्बल आठ दशकांचा सांगितिक वारसा संगीतप्रेमींसाठी ठेवला आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील सर्वात अलिकडील प्रख्यात गायकांचे ते मानबिंदू होते.