वॉशिंग्टन :- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी अटलांटा तुरुंगात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांना औपचारिक अटक करण्यात आली. आरोपी म्हणून पोलिसांनी त्यांची छायाचित्रे घेतली, गुन्हे नोंद केले आणि मग अर्ध्या तासानंतर त्यांना सोडण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प हे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांचा फोटो पोलिसांनी कोणत्याही प्रकरणात आरोपी म्हणून घेतला आहे. अमेरिकेत यापूर्वी कधीही कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला किंवा माजी राष्ट्राध्यक्षांना अशा मानहानीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले नव्हते.
डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने शरण येण्याची सूचना केली होती. यावर, 77 वर्षीय ट्रम्पसह, या प्रकरणातील एकूण 19 आरोपींनीही आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांना जॉर्जिया राज्यातील फुल्टन काउंटी जेलमध्ये अटक करण्यात आली. या वर्षी निवडणुकीच्या आधी, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या विविध न्यायालयात एकूण चार वेळा शरणागती पत्करली आहे. मात्र, पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावे लागण्याची वेळ त्यांच्यावर प्रथमच आली. ट्रम्प यांच्यावर जॉर्जियामधील 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा “मग शॉट’ (पोलीस रेकॉर्डसाठीचा फोटो) अटलांटा तुरुंगात घेतला जाणार होता. त्यासाठी ट्रम्प न्यू जर्सीहून त्यांच्या खासगी विमानाने अटलांटाला रवाना झाले आणि नंतर ते फुल्टन काउंटी जेलमध्ये पोहोचले. येथे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने थांबले होते. ट्रम्प तुरुंगात पोहोचताच डझनभर समर्थक बॅनर आणि अमेरिकन झेंडे फडकावत ट्रम्प यांना पाहण्यासाठी जमले होते.
ट्रम्प जॉर्जियामध्ये 13 वेगळ्या खटल्यांचा सामना करत आहेत. यामध्ये फसवणूक, खोटी विधाने यासह अनेक प्रकरणांचा समावेश आहे. यापूर्वी ट्रम्प यांचे माजी सहकारी मार्क मेडोज यांनी फुल्टन काउंटीमध्ये आत्मसमर्पण केले होते. काउंटीच्या वेबसाइटनुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या 18 सह-प्रतिवादींपैकी मीडोज एक आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी फक्त 20 मिनिटे तुरुंगात घालवली आणि पुन्हा त्यांच्या न्यू जर्सी गोल्फ क्लबमध्ये गेले. तथापि, अटलांटामधील हार्टसफिल्ड-जॅक्सन विमानतळावर त्याच्या खासगी विमानात बसण्यापूर्वी, त्यांनी दावा केला की, त्यांना फसवले जात आहे. वर्ष 2024 च्या रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या नामांकनासाठी आघाडीवर असलेले ट्रम्प म्हणाले की हा अमेरिकेसाठी खूप दुःखाचा दिवस आहे. येथे जे काही घडले ते न्यायाची पायमल्ली आहे. मी काही चुकीचे केले नाही.
अशी झाली कारागृहात नोंद…
फुल्टन काउंटी जेलच्या नोंदीनुसार, मग शॉट डोनाल्ड ट्रम्प कैदी क्रमांक P01135809 चा घेण्यात आला होता. यावेळी ट्रम्प कॅमेऱ्याकडे टक लावून बघताना कैद झाले. शेरीफच्या कार्यालयाने जारी केलेल्या फोटोमध्ये, गडद निळ्या रंगाचा सूट, पांढरा शर्ट आणि लाल टाय परिधान केलेले ट्रम्प कॅमेऱ्याकडे रागाने बघताना दिसत आहेत. फुल्टन काउंटी जेलने ट्रम्प यांना 6 फूट 3 इंच (1.9 मीटर) उंच, 215 पौंड (97 किलो) आणि त्यांच्या केसांचा रंग सोनेरी किंवा स्ट्रॉबेरी म्हणून सूचीबद्ध केला.