पुणे – तब्बल 19 वर्षांनी झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (ता. हवेली) निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कुत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने विजय संपादीत केला आहे. लढविलेल्या 15 पैकी 13 जागा जिंकल्या अहेत. सेवा सहकारी संस्थाच्या मतदार संघात शंभर टक्के यश मिळविले आहे.
11 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात चौरपैकी दोन जागा जिंकल्या आहेत. तर या गटात मिळालेल्या दोन जागांवरच राष्ट्रवादीच्या पॅनेलला समाधान मानावे लागले आहे. हवेली मतदार संघातील पराभवत राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे. भाजपने बाजार समितीमध्ये शिरकाव केला आहे.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि पुणे बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे यांना सेवा सोसायटी मतदार संघातून सर्वाधिक मते मिळाली आहेत. 1032 मते घेऊन ते विजयी झाले. तर, माजी सभापती दिलीप काळभोर 805, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रशांत काळभोर 880, माजी संचालक राजाराम कांचन 854 , माजी सभापती प्रकाश जगताप 939 , नितीन दांगट 1019 , दत्तात्रय पायगुडे 830 हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहे.
या गटात एकुण 1700 मतदान झाले. त्यापैकी सर्वसाधारण मतदार संघात 1604 मते वैध ठरली. उर्वरित 96 मते बाद झाली. सेवा संस्थाच्या इतर मागास प्रवर्गातील शशिकांत गायकवाड 860 मते घेऊन विजयी झाल्या. येथे 1700 पैकी 48 मते बाद झाली.
सेवा संस्था विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातून लक्ष्मण केसकर विजयी झाले. त्यांना 879 मते घेत विजयी झाले. या गटात 1700 पैकी 52 मते बाद झाली. महिला राखीव मतदार संघातून मनीषा हरपळे 1 हजार 76, तर सारिका हारगुडे 868 मते घेऊन विजयी झाले. येथे 1700 पैकी 1656 मते वैध ठरली. तर 44 मते बाद झाली आहेत.