मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन युक्रेनवरील हल्ल्यानंतर अनेकांच्या टीकेचे धनी बनले. अमेरिका आणि तिच्या वर्चस्वाखालील नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात नाटो संघटनेतील देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. अर्थात त्याचा फारसा परिणाम पुतीन यांच्यावर झालेला नाही. अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मते पुतीन यांची जडणघडण पाहता ते अमेरिका किंवा नाटो देशांच्या भूमिकेला भीक घालणार नाहीत. ते स्वतःचे म्हणणे प्रत्यक्षात आणण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशा या पुतीनकडे प्रचंड बेहिशेबी संपत्ती असल्याचे सांगितले जाते. ज्याच्या जिवावर ते अतिशय अलिशान जीवन जगतात.
ब्रिटनमधील मिररच्या संकेतस्थळावरील बातमीनुसार पुतीन यांचे निवासस्थान पुतीन पॅलेस नावाने ओळखले जाते आणि त्याची किंमत जवळपास 74 अब्ज रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे 741 कोटी रुपयांचे स्वतःचे सुपरयाट आहे. त्यावर अनेक शयनकक्ष, जलतरण तलाव आणि हेलीपॅड आदी सुविधा आहेत. पुतीने यांचे हे निवासस्थान काळ्या समुद्राच्या किनारी असल्याचे सांगितले जाते. त्याठिकाणी संगमरवराचा जलतरण तलाव आहे. ग्रीक देवीदेवतांच्या ग्रीक मूर्ती याठिकाणी उभारून जलतरण तलावाची सजावट करण्यात आली आहे. त्याठिकाणी वाईनबार, थिएटर आणि पोल डान्सिंग क्लब अशा सुविधा आहेत. मात्र हा पॅलेस आपल्या मालकीच्या नसल्याचे पुतीन यांनी स्पष्ट केले आहे.
या पॅलेसखेरीज पुतीन यांची आणखी 19 ठिकाणी निवासस्थाने आहेत. त्यांच्याकडे 58 खासगी मालकीची विमाने आणि हेलीकॉप्टर, 700 अलिशान मोटारी आहेत. त्यांना घड्याळे जमवण्याचाही छंद आहे. त्यांना विदेशी प्राणी पाळण्याचाही शौक आहे. 2015 मध्ये त्यांच्याकडील बोरीस नावाचा एक वाघ जंगलात मुक्त करण्यात आला. त्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले होते.
त्यांच्याकडे सुमारे 200 अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचा अंदाज हेज फंडाचे व्यवस्थापक बिल ब्राऊनर यांनी व्यक्त केला होता. त्याचवेळी पुतीन यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे याचा नेमका ठावठिकाणा कुणालाही माहिती नाही.
कुख्यात पंडोरा पेपर्समधील माहिती उघड झाल्यानंतर अनेक देशांचे प्रमुख, अधिकारी, नेत्यांचे नाव त्यामध्ये असल्याचे पुढे आले होते. त्यामध्ये पुतीन यांचेही नाव आहे. पुतीन यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती गोळा केल्याचे आणि त्या व्यवहारांसाठी करमुक्त बेटांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार पुतीन यांच्या स्वेतलाना क्रिवोनोगिख या कथित गर्लफ्रेंडच्या मालकीच्या कंपनीने ब्रिटनमध्ये 30 कोटी रुपये किंमतीचे अपार्टमेंट खरेदी केले होते. त्याची खरी मालकीण स्वेतलाना होती असे सांगितले जाते. पंडोरा पेपर्समधील माहितीनुसार पुतीन यांची मोनॅकोमध्येही गुप्त संपत्ती असल्याचा दावा केला जातो.
रशियाच्या अध्यक्षांचे कार्यालय अशी ओळख असलेल्या क्रेमलिनच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा तर पुतीन यांना महिन्याला 1.40 लाख डॉलर एवढे वेतन मिळते. भारतीय रुपयांमध्ये रुपांतरीत केली तर ही रक्कम सुमारे 1.05 कोटी एवढी होते. त्या तुलनेत भारताच्या राष्ट्रपतींना अगदीच किरकोळ म्हणजे वार्षिक 60 लाख रुपये वेतन मिळते.
पुतीन यांचे वय आता 69 आहे आणि या वयातही ते अतिशय तंदुरुस्त आहेत. अगदी पन्नाशीत असल्याप्रमाणे त्यांच्या हालचाली असतात. त्याचे पोहताना, घोडेस्वारी करताना किंवा लष्करी सराव करतानाची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. पुतीन यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. त्याशिवाय पुतीन योग, खेळ आणि घोडेस्वारीमध्ये सक्रिय राहिलेले आहेत. या सर्वांमुळे पुतीन यांची माचो मॅन अशी ओळख निर्माण झालेली आहे.
ते आठवड्यातून एक किंवा दोन दिवस घोडेस्वारी करणे पसंत करतात. पुतीन स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये नियमित व्यायाम आणि स्विमिंग करतात. ते दररोज दोन तास स्विमिंग आणि एक तास जिममध्ये वर्कआऊट करतात. पुतीन त्यांच्या ब्रेकफास्टला खूप महत्त्व देतात. सकाळी उठल्यानंतर ते सर्वप्रथम ब्रेकफास्ट करतात. ब्रेकफास्टमध्ये ते अंडी, डाळ आणि ज्यूस घेतात.
पुतीन सोव्हिएत संघाची गुप्तचर संस्था केजीबीमध्ये 16 वर्षं गुप्तहेर म्हणून काम करत होते. 1991 साली राजकारणात येण्यासाठी त्यांनी केजीबीतील पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 1999 साली पुतीन यांना हंगामी राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आलं. चारच महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत विजयी होऊन पुतीन पूर्ण वेळ राष्ट्रपती झाले. 1953 साली निधन झालेले सोव्हिएत संघाचे नेते जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर रशियाचं अध्यक्षपद सर्वाधिक काळ सांभाळणारे नेते पुतीन आहेत.
या वर्षी एप्रिल महिन्यात सांविधानिक दुरुस्त्यांशी संबंधित वादग्रस्त राष्ट्रीय सार्वमत घेण्यात आलं, त्यानुसार पुतीन यांचा सध्याचा कार्यकाळ 2024 साली समाप्त झाल्यानंतरही त्यांना सत्तेत राहण्याची संधी मिळणार आहे. अशा रितीने 69 वर्षीय पुतीन यांचा 2036 सालापर्यंत सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुतीन यांचा रशिया
रशिया हा जगातील सर्वांत मोठा देश असून त्याचं क्षेत्रफळ 1.7 कोटी चौरस किलोमीटर इतकं आहे.
अमेरिकेनंतर दर दिवशी 10.27 बॅरल तेलाचं उत्पादन करणारा रशिया हा दुसरा सर्वांत मोठा तेलउत्पादक देश आहे.
अमेरिकेनंतर सर्वाधिक अण्वास्त्रं रशियाकडे आहे. रशियातील अण्वास्त्रांची संख्या 6,375 इतकी आहे.
संरक्षण क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत रशिया चौथ्या स्थानावर आहे. रशियाने 2020 साली संरक्षणावर 66 अब्ज 84 कोटी अमेरिकी डॉलर खर्च केले.
रशिया हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य असून त्याच्याकडे नकाराधिकार आहे.