सणांचा राजा दिवाळी : भाऊबीज

– विलास पंढरी

दिवाळीतील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज, ज्याचे आजच्या स्वार्थ वाढत चाललेल्या वातावरणात जास्त महत्त्व आहे.

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. बहीण-भावातील प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर ताटात “ओवाळणी’ देऊन बहिणीचा सन्मान करतो. भाऊबिजेच्या दिवशी चित्रगुप्ताचीही पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.

कायस्थ समाजाचे लोक या दिवशी दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रं, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात. असे केल्यामुळे त्यावर्षी यमापासून तरी भय नसते, असा समज आहे.

यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे, की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले. तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली.

आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करायची. या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड, दागिना असे वस्तू ओवाळणी देतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये, असा संकेत आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.