पुणे – प्लॅट घेण्याकरीता माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून मानसिक त्रास देत महिलेला व्हॉट्सअॅप मेसेजवरूनच तीन तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीवर समर्थ पोलीस ठाण्यात मुस्लिम विवाह (विवाहवरील हक्काचे संरक्षण) कायदा २०१९ चे कलम ४ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा पती साजिद मगदुम शेख आणि सासू जैबुनिसा मगदुम शेख (रा. लोहीयानगर, गंजपेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत नाना पेठ येथे राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. शेख यांचा तक्रारदार महिलेशी विवाह झाला होता. विवाहानंतर सातत्याने शेख हे पत्नीला माहेरहून कुलर, रॅक आदी साहित्य आणण्याची मागणी करीत होते. तसेच, प्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी महिलेला मानसिक त्रास देऊन मारहाण करण्यात आली.
महिलेला आपल्या मुलीसह तिच्या माहेरी पाठवून देण्यात आले. त्यानंतर तिचा सांभाळ न करण्याच्या उद्देशाने मार्च महिन्यात महिलेच्या व्हॉट्सअॅप मेसेजवर तीनवेळा तलाक लिहून बेकायदेशीर तलाक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने केलेल्या अर्जावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एच. बी. खोपडे करीत आहेत.