पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार 471 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, राज्य शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामध्ये औंध जिल्हा रुग्णालयासह पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या साह्याने हे उद्दिष्ट गाठता आले.
प्रधानमंत्री नेत्रज्योती अभियानाअंतर्गत मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 10 हजार रुग्णांच्या शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये पुणे जिल्ह्याने 12 हजार 471 रुग्णांची शस्त्रक्रिया केल्याची माहिती जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी यांनी दिली.
राज्यभरात 19 फेब्रुवारी ते 9 मार्चदरम्यान राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात आली. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. या कालावधीत राज्यात 1 लाख रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले होते. शासकीय रुग्णालय, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.